मेंढपाळाच्या वाड्यावर दरोडा : मारहाण करून दागिन्यांची लूट

0

सुप्याजवळील कोल्हे वस्तीवरील घटना

सुपा (वार्ताहर) – पारनेर तालुक्यातील सुपा येथील कोल्हे वस्ती शिवारात मेंढपाळ गजानन भानुदास टकले (वय-35, व्यवसाय-मेंढपाळ रा. भोयरे गांगर्डा, सध्या रा. सुपा कोल्हे वस्ती) यांच्या वाड्यावर मंगळवारी पहाटे चोरट्यांनी टाकलेल्या दरोड्यात गजानन टकले यांना जबर मारहाण करून सुमारे 34 हजार 400 रुपयांचे दागिने हिसकावून पोबारा केला. याबाबत गजानन टकले यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलीस स्टेशनला चार अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करप्यात आला आहे.
मेंढपाळीचा व्यवसाय करणारे गजानन टकले हे आपल्या कुटुंबासह सुमारे तीन महिन्यांपासून सुपा येथील वाळवणे रस्त्यालगत असणार्‍या कोल्हे वस्ती मळगंगा देवीच्या शेजारी राहतात. सोमवारी दिवसभर मेंढ्यांना चारून आणल्यानंतर रात्री 10 वाजता आपल्या कुटुंबासमवेत वाड्यात झोपले असताना मंगळवारी पहाटे 3.30 वाजता चार चोरट्यांनी त्यांच्या वाड्यात प्रवेश करून गजानन यांना लाकडी दांडक्याने पाठीत जबर प्रहार करून जखमी केले.
त्यांच्या पत्नी रंजना यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अंदाजे 7 ग्रॅम वजनाचे दोन पळ्या रक्कम 14 हजार, दोन कानातील डूल अंदाजे 10 ग्रॅम वजनाचे, रक्कम 20 हजार रुपये रोख, दोन पायातील चांदीचे जोडवे अंदाजे 10 ग्रॅम वजनाचे, 400 रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागीने बळजबरीने हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला.
पत्नी रंजना यांनी आरडाओरडा केल्यानंतर कोल्हे वस्तीवरील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. मात्र तो पर्यंत चोरटे दागिने घेऊन पसार झाले होते. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील राजकीय पदाधिकार्‍यांसह ग्रामस्थांनी केली आहे.  दरम्यान सुपा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता पोलीस उपनिरीक्षक बी. जे. पठाण यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

 

LEAVE A REPLY

*