सारोळा कासार येथे भर दिवसा दरोडा

0

दीड लाखास भाविकांना लुटले, दोघांना अटक

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील सारोळा कासार येथे पद्मावती देवीचे दर्शन घेऊन घोसपुरी येथे जाणार्‍या भाविकांना पाच दरोडेखोरांनी भर दिवसा लुटल्याची घटना दिनांक 22 जुलै रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली होती. यात तिघांकडून तब्बल एक लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला होता. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात राहुल निर्वाशा भोसले व निर्वाशा चंदर भोसले या दोघांना पोलिसांनी अटक केली असून सोम्या उर्फ सोमनाथ कराश्या भोसले, कराशा चंदर भोसले, व अन्य एक असे तिघे पसार आहेत.
शनिवार दि.22 जुलै रोजी दुपारी शशिकांत सीताराम पटेल (रा. हिरावाडी, नाशिक) हे त्यांच्या पत्नीसह मित्रास घेऊन नगर तालुक्यातील पद्मावती देवीचे दर्शनासाठी सारोळा कासार येथे गेले होते. तेथील देवदर्शन अटोपल्यानंतर सर्व भाविक त्यांच्या फियेस्टा कार एम. एच 02 सीडी 7219 मधून घोसपुरीकडे निघाले होते.
दरम्यान याच शिवारात भर दिवसा आरोपींनी त्यांची कार अडविली. तिघांना ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्याजवळील मोबाईल, सोन्याचे मंगळसूत्र, अंगठ्या व रोख रक्कम असा एक लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला. पटेल यांनी चोरट्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता पाच जणांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्या ताब्यातील विळा, सत्तूर गळ्याला लावून त्यांना लुटले. घडलेला प्रकार कोणाला सांगाल तर ठार मारू असे म्हणून दरोडेखोरांनी भाविकांना धमकी दिली. या घटनेमुळे भेदरलेल्या अवस्थेत असताना पटेल यांनी थेट नाशिक गाठले. त्यांची मानस्थिती स्थिर झाल्यानंतर मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात हजर राहुन गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक आनंद भोइटे यांच्या मार्गदर्शनाखाली हायक पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांनी राहुल भोसले व निर्वाशा भोसले या बापलेकास अटक केली आहे. त्यांच्याकडून अन्य दोन दरोड्यांची नावे उघड झाली आहेत. हे सराईत गुन्हेगार आणखी कोणत्या गुन्ह्यांत आहेत का यासाठी दोघांना पोलीस कोठडी मिळविण्यासाठी आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास परदेशी करीत आहेत.

LEAVE A REPLY

*