दारणा धरणात 1 टीएमसी पाणी

0
अस्तगाव (वार्ताहर)- दारणाच्या पाणलोटात काल गुरुवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पाणी दारणा धरणात दाखल होत असल्याने या धरणात काल सायंकाळपर्यंत 1 टीएमसी पाणी साठा झाला. दारणानदी पात्र, ओढे -नाले वाहू लागल्याने नवीन पाणी दाखल होण्याचे सातत्य टिकून राहाणार आहे. भावली प्रकल्पातही पाण्याची आवक सुरू आहे. तर गंगापूर परिसरात पावसाने काल विश्रांती घेतली होती.
कालच्या संततधार पावसामुळे दारणात नवीन पाण्याची आवक होत आहे. गुरुवारी सकाळी संपलेल्या 24 तासांत दारणात 131 दशलक्ष घनफूट पाणी नव्याने दाखल झाले होते. सकाळपर्यंत हे धरण 10.49 टक्के भरले होते. 7149 क्षमतेच्या या धरणात 750 दशलक्ष घनफूट पाणीसाठा तयार झाला होता.
काल दिवसभर पडत असलेल्या संततधारेमुळे सायंकाळपर्यंत या साठ्यात वाढ होऊन तो 1000 दशलक्षघनफूटहून अधिक झाला होता. पावसाचे सातत्य राहिल्यास दोन तीन दिवसांत हे धरण निम्मे भरेल असा अंदाज आहे. काल गुरुवारी सकाळ पर्यंत संपलेल्या 24 तासांत या धरणाच्या भिंतीजवळ 16 मिमी, पाणलोटातील इगतपुरी येथे 99 मिमी, घोटी येथे 90 मिमी, पावसाची नोंद झाली आहे.
या पावसामुळे नदी, तसेच ओढे धरणाच्या दिशेने वाहत आहेत. शेजारील भावली धरणाचा साठाही फुगत आहे. 1434 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या धरणात 332 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. या धरणात 24 तासात 90 दशलक्ष घनफूट पाणी नव्याने दाखल झाले आहे. भावलीच्या भिंतीजवळ 98 मिमी पावसाची नोंद झाली आहे. काल दिवसभरही या धरणाच्या परिसरात संततधार सुरु होती. रात्रीतून या धरणात अर्धा टीएमसीहुन अधिक पाणी साठेल असा अंदाज आहे.
गंगापूर धरणाच्या परिसरात मात्र काल पावसाने गुंगारा मारला. मात्र काल सकाळी संपलेल्या 24 तासात 21 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्याच्या पाणलोटातील त्र्यंबक येथे 22, अंबोली येथे 31 मिमी पावसाची नोंद झाली. 24 तासांत या धरणात 15 दशलक्ष घनफूट पाणी नव्याने दाखल झाले. हे धरण 23.11 टक्के भरले आहे.
5630 क्षमतेच्या या धरणात 1301 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. अन्य धरणांचा पाणीसाठा असा- कडवा 2.62 टक्के, आळंदी 2.55, काश्यपी 21.06, वालदेवी 4.85, गौतमी 6.28 टक्के असा साठा आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत नाशिक येथे 8, गौतमी 9, काश्यपी 6,मुकणे 25, कडवा 9, आळंदी 7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. काल गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात दुपार नंतर हालक्या सरींचे आगमन झाले होते. मात्र तो प्रभावी नव्हता.

LEAVE A REPLY

*