दारणात 52 टक्के पाणीसाठा

0

गोदावरीत 2018 क्युसेकने पाणी

अस्तगाव (वार्ताहर)- सह्यद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाच्या दमदार हजेरीने दारणा धरण निम्मे भरले आहे. काल सकाळी हा साठा 51.28 टक्क्यांवर पोहचला होता. 7149 क्षमतेच्या दारणात 3666 दशलक्ष घनफूट म्हणजेच साडेतीन टीएमसीहुन अधिक पाणीसाठा झाला आहे. दारणातून गोदावरीच्या दिशेने 550 दशलक्ष घनफूट वेगाने विसर्ग सोडला जात आहे. तर मधमेश्‍वर मधून 2018 क्युसेकने गोदावरी नदीत पाणी सोडले जात आहे.
दारणाच्या पाणलोटात काल सोमवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. त्यामुळे अधून मधून पावसाची सरी कोसळत होत्या. या धरणाचा साठा निम्म्याहून अधिक झाला आहे. धरणाच्या विद्युत प्रकल्पाच्या गेट द्वारे 550 क्युसेकने पाणी विसर्गाच्या रुपात सोडले जात आहे. रॅडिअल गेटच्या तळाला पाणी लागले आहे. एक दोन दिवसात अजूनही जोरदार पाऊस आल्यास पाण्याची आवक वाढल्यानंतर या गेटमधून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो.
काल सकाळी संपलेल्या 24 तासांत दारणाच्या भिंतीजवळ 11 मिमी, पाणलोटातील इगतपुरी येथे 47, घोटी येथे 43 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शेजारील भावली धरणही अर्धे भरण्याच्या मार्गावर आहे. 1434 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या धरणात 677 दशलक्ष घनफूट साठा झाला आहे. या धरणाच्या भिंतीजवळ 65 मिमी पावसाची नोंद झाली होती.
गोदावरीतील विसर्ग टिकून! पाणी पुणतांब्यात – 
दारणाचा 550 क्युसेकचा विसर्ग आणि नांदुरमधमेश्‍वर बंधार्‍यात पाणलोटातील ओढे नाल्यांमधून होत असलेली आवक यामुळे या बंधार्‍यातून गोदावरी नदीत 2018 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. या गोदावरीतील पाण्याने काल कोपरगाव ओलांडले होते.रात्रीतून ते पुणतांब्यात दाखल होईल असा अंदाज आहे. वाळूच्या खड्यांमुळे व पाण्याला कमी वेग असल्याने पाणी उशीराने पुढे सरकत आहे.
काल सायंकाळी 6 वाजता पुणतांब्या जवळील रस्तापुरला पाणी पोहचले होते. रात्रीतून 12 वाजता ते पुणतांब्यात पोहचेल. आज मंगळवारी आषाढी एकादशी निमित्त श्रीक्षेत्र पुणतांब्याला भाविकांची गर्दी असते. त्यात नदीला पाणी आल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. पावसाने दडी मारल्यास हा विसर्ग दोन दिवसात कमी कमी होत जाईल. गंगापूर धरणाचा साठा 37.57 टक्के इतका झाला आहे. 5630 क्षमतेच्या धरणात 2115 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे.
या धरणाच्या भिंतीजवळ 50 मिमी पावसाची नोंद झाली. तसेच पाणलोटातील अंबोली येथे 34, त्र्यंबक येथे 30, नाशिक येथे 19 मिमी पावसाची नोंद झाली. अन्य धरणांचे साठे असे- कडवा 22.95 टक्के, मुकणे 4.50 टक्के, आळंदी 6.57 टक्के, काश्यपी 28.35 टक्के, वालदेवी 12.18 टक्के, गौतमी गोदावरी 17.27 टक्के, नांदुरमधमेश्‍वर 81.57 टक्के असा पाणीसाठा आहे.
पिण्यासाठी आवर्तनाची शक्यता दरम्यान गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात अद्यापि समाधानकारक पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी गोदावरी कालव्यातून पिण्याचे पाणी सोडण्याची चिन्हे आहेत. कोपरगाव तसेच राहाता उपविभागांनी याबाबत काल सोमवारी वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन घेण्याची चिन्हे आहेत.
गोदावरी कालव्यातून ओव्हरफ्लोचे पाणी सोडावे, अशी मागणी गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ यांनी केली आहे. गणेश परिसरातील ओढे नाले तसेच साठवण तळे, गणेश बंधारे भरुन द्यावेत असा आग्रह त्यांनी जलसंपदा विभागाकडे धरला आहे. याशिवाय गणेशचे माजी संचालक दिलीपराव गाढवे, मोठ्याभाऊ दातीर यांनी केली.

 

LEAVE A REPLY

*