दमणगंगा-एकदरे लिंक नदीजोड प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता

0

नाशिक । दि. 22 प्रतिनिधी
नाशिकच्या भविष्यासाठी वरदान ठरणार्‍या दमणगंगा-एकदरे लिंक या नदीजोड प्रकल्पाला राज्य शासनाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिकसाठी पाच हजार दलघफू इतके अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना पिण्यासह सिंचन आणि उद्योगांना याचा उपयोग होणार असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली.

पाण्याचे नियोजन करणे ही काळाची गरज आहे. आज पश्चिमेकडील नद्यांचे पाणी अरबीसमुद्राला मिळते. त्यामुळे भरपूर पाऊस पडूनही त्याचा जिल्ह्यासाठी काहीही एक उपयोग होत नाही.

त्यामुळे वाहून जाणारे पाणी अडवणे हा एक पर्याय समोर आहे. याकरिता दमणगंगा एकदरे लिंक योजनेसंदर्भात जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्या मदतीने प्रस्ताव तयार करून तो राज्य शासनाला सादर केला.

दीड वर्षाच्या पाठपुराव्यानंतर या प्रकल्पाला राज्य शासनाने मंजुरी दिल्याचे खा. गोडसे यांनी सांगितले. नाशिकसाठी पाणी उपलब्ध नसल्याने दिल्ली, मुंंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यात नाशिकचा सामावेश होवू शकला नाही. परंतु औरंगाबाद येथील शेंद्रा बिडकिन येथे हा कॉरिडॉर प्रस्तावित करण्यात आला.

त्यामुळे पहिल्या टप्प्यात नाशिकवर अन्याय झाला. मात्र या योजनेमुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचन आणि उद्योगास पाणी उपलब्ध होणार असल्याने दिल्ली, मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या दुसर्‍या टप्प्यात नाशिकचा समावेश होण्यास मदत होणार आहे. 29 जानेवारी 2016 रोजी या योजनेचा कोकण खोरे महामंडळाच्या बृहत आराखड्यात सामावेश करण्यात आला आहे. गंगापूर कालव्यांच्या 12 हजार हेक्टरच्या सिंचनात निर्माण झालेली तूट या प्रकल्पातून भरून निघणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्य
पेठ तालुक्यातील एकदरे गावाजवळ दमणगंगा नदीवर 5 हजार दलघफू क्षमतेचे धरण बांधण्यात येणार आहे. सदरचे पाणी हे 8 किलोमीटर लांबीच्या पाईपलाईनद्वारे 210 मीटर उपसा करून उमरद गावाजवळ खीरा डोंगरावर आणण्यात येईल. तेथून पुढे 5.5 किलोमीटर लांबीच्या बोगद्याद्वारे गंगापूर धरणात टाकण्यात येणार आहे. यामुळे नाशिकच्या विकासासाठी पाच हजार दलघफू इतके अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे.

LEAVE A REPLY

*