नव उद्योगांना प्रोस्ताहन मिळावे – योगेश्वर दंडे

0
योगेश्वर दंडे
शहर विकासात नाशिकरोडचे योगदान मोठे आहे. व्यापारी बाजारपेठेसह बांधकाम, सराफा, वैद्यकीय, शिक्षण आदी सर्वच क्षेत्रात येथील धुरंधरांनी मिळवलेले यश नेत्रदिपक आहे. कालपरत्वे पहिल्या पिढीतील बिनीच्या शिलेदारांनी आपापल्या व्यवसायाची सूत्रे पुढच्या पिढीकडे दिलेली असून नव्या पिढीच्या उमद्या व्यावसायिकांनी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपापल्या व्यवसायात भर घातलेली दिसून येते.

नाशिकरोडच्या सराफ व्यावसायिकांत अग्रक्रमाने उल्लेख करावासा वाटणार्‍या मे. गोविंद दंडे ऍण्ड सन्सचे युवा उद्योजक योगेश्‍वर दंडे यांनी सुवर्ण व्यवसायाला उच्चतम दर्जा देण्याचा मानस व्यक्त केला आहे. विकासाची सर्वोच्च उंची गाठण्यासाठी त्यांच्या संकल्पनेतील नाशिक कसे असावे, याबाबत त्यांनी मांडलेले विचार नव उद्योजकांबाबत आशा पल्लवित करणारे आहेत.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात नाशिकला वैभवशाली औद्योगिक चेहरामोहरा मिळाला. सातपूर, अंबड, सिन्नर, ओझर, मालेगाव, गोंदे हे नाशिकचे औद्योगिक परिवर्तन घडवणारे महत्त्वाचे शहरे आहेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय आदी सर्वच बाजूंनी येथील उद्योग-व्यवसाय बहरला आहे.

नाशिकला लाभलेल्या नैसर्गिक वैविध्यामुळे निसर्ग पर्यटनासाठी अनेक पर्याय आहेत. अभ्यासपूर्ण नियोजन आणि योग्य काळजी घेऊन या नैसर्गिक वरदानाचे मर्म जाणून घेतल्यास अनेक पूरक व्यवसाय नाशिकमध्ये नव्याने उदयास येतील. सद्यस्थितीत स्मार्ट सिटी अंतर्गत शहर विकासाचे वारे वाहत असताना मूलभूत सुविधांचा स्तर दर्जेदार तर हवाच.

परंतु नव उद्योगांना प्रोत्साहन देणारे पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. इलेक्ट्रॉनिक हब, आयटी हब, मेडिकल हब आदींची पायाभरणी यशस्वीपणे झाल्यास मुंबई-पुणे-नाशिक हा सुवर्ण त्रिकोण खर्‍या अर्थाने पूर्णत्वास येईल. केवळ नवीन उद्योगांनाच नव्हे तर सोबत नवनव्या शासकीय प्रकल्पांची पायाभरणी नाशिकमध्ये होणे गरजेचे आहे.

कारण बदलत्या परिस्थितीने नाशिकसमोर नवनवे आव्हाने निर्माण झालेले आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षांत नव्याने कोणताही मोठा उद्योग वा प्रकल्प नाशिकमध्ये आलेला नाही. किंबहुना आहे त्याच प्रकल्पांवर टाच येत असल्याचे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. तथापि समस्या व त्यावरील उपायांवर समाजमंथन होणे गरजेचे आहे.

कारण त्यातूनच नवीन उपाय समोर येऊ शकतात व ते उपाय आकाशाला गवसणी घालणार्‍या प्रत्येक नाशिककराला एक विस्तारित अवकाश मिळण्यास कारणीभूत ठरू शकतात, असा मला ठाम विश्वास आहे.

जुन्या वाटेवरून चालण्यापेक्षा नवीन वाटेचा स्वीकार केल्यास यशही नवे मिळते, यावर आपला विश्वास आहे. शहर विकासाकडे झेपावत असताना नव्या व्यवसाय उद्योगांची मुहूर्तमेढ रोवणे ही काळाची गरज बनली आहे.

नव उद्योगांना प्रोत्साहन देताना शासकीय नियम व अटीमध्ये सुलभता असावी. कारण जॉब क्रिएशन झाले तर गरजा वाढतात आणि शहर विकास साधायचा म्हटल्यास कुशल कर्मचारी वर्ग शहरात स्थायिक होणे तेवढेच महत्वाचे आहे.

याशिवाय छोट्या व्यवसायांना पुश मिळणेही आवश्यक आहे. एकूणच शहर विकासासाठी जादा लोकांची गरज असून नवीन उद्योगांची निर्मिती आणि तत्संबंधी सर्व स्तरातून प्रामाणिक प्रयत्न झाल्यास व्यवसायाचे चक्र जोराने फिरू शकतील.

 

LEAVE A REPLY

*