सक्षम इंफ्रास्ट्रक्चरची गरज -विपूल नेरकर

0
विपूल नेरकर
शहराचा विकास हा त्या शहराच्या सर्वांगीण गुणवत्तांच्या विकासातून होत असतो. त्यासाठी नागरिक शासन व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. शहरांत मोठ्या प्रमाणात जुन्या वसाहती आहे. अनेक गावांचा समावेश महानगरात झाला असला तरी त्याठिकाणचा विकास मात्र रोडावलेलाच आहे.

त्यामुळे विविध भागांच्या गरजांनुसार विकास आराखडा तयार करण्यासाठी ‘क्लस्टर’ डेव्हलप करून त्या-त्या भागाच्या गरजांनुसार भागाचा विकास करण्याचा प्रयत्न झाला तर त्या भागाचा विकास करणे सोपे होणार आहे.

शहरातील पार्किंगची समस्या मोठी आहे. त्यासाठी ठिकठिकाणी पार्किंग उभारणे गरजेचे आहे. प्रशासनाद्वारे दळणवळणाची सुविधा अद्ययावत व सक्षम केली तर रस्त्यावरील खासगी वाहनांची गर्दी आपोआप कमी होण्यास मदत होईल.

त्यासोबतच सायकल ट्रॅकच्या माध्यमातून नागरिकांना सायकलवर चालणे मप्रमोटफ केल्याने देखिल प्रदूषणाचा स्तर कमी करण्यात मोलाचे योगदान राहणार आहे. शहरातील ड्रेनेज यंत्रणा ही पुढील १५ ते २० वर्षांच्या नियोजनाने तयार करणे गरजेचे आहे. त्यामुळे शहराला स्वच्छ ठेवण्यात नागरिकांचाही सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.

रस्ते व्यवस्था स्मार्ट करण्याच्या दिशेने प्रशासन पुढे जात असले तरी त्यांच्या कामाला दिशा देण्यासाठी आपलेही योगदान गरजेचे आहे. अनेक सामाजिक संस्था व एनजीओ यासाठी सज्ज आहेत.

प्रशासनाने त्यांच्या मदतीतून विविध संकल्पना कार्यान्वित करण्यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य शासनाकडे मोठ्या प्रमाणात योजना आहेत. त्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न व्हावा. त्यांच्या अवलंबनासाठी एनजीओची मदत घेऊन काम पुढे नेण शक्य आहे.

कोणतेही शहर स्मार्ट करताना त्या शहरातील नागरिकांनाही स्मार्ट करणे गरजेचे आहे. किंबहुना, त्यांना याबाबत जागरुक करून स्मार्ट शहराच्या उपक्रमात सहभागी करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा स्मार्ट नाशिक हा उपक्रम एका ठराविक गटाचा कार्यक्रम ठरेल.

घंटागाडी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापनासह ड्रेनेच यंत्रणा या शहराच्या घाणीचे दर्शन घडवत असतात. शहराच्या अनेक भागांना आजही भूमिगत गटारांशी जोडलेले नाही. त्याना जोडणे गरजेचे आहे. ते आजही जुन्या सोकपिटचा वापर करीत आहेत. ते फारसे योग्य नाही.

उद्योगांच्या विकासात शहराच्या विकासाची मोठे गणित सामावलेले आहे. त्यामुळे शहरातील उद्योगांना लागणार्‍या पायाभूत सुविधा देऊन त्यांना सक्षम करणे गरजाचे आहे. त्यातून रोजगारासोबतच मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार आहे. त्याक्षेत्राच्या गुणवत्तेवरच नव्या गुंतवणुका शहरात येेणार आहेत. त्या माध्यमातून रोजगार, पुरवठादार व पर्यायाने बाजारात खेळणार पैसा मिळणार आहे.

शहराला स्मार्ट करण्यासाठी सर्वच बाबींचा विचार करणे गरजेचे असल्याने प्रशासनाने नागरिक, सामाजिक संस्था व सरकारी यंत्रणा यांचा समन्वय साधत नियोजनबद्ध विकास साधण्याचा प्रयत्न केल्यास नाशिक शहर स्मार्ट शहरांच्या यादीत अग्रस्थानी राहील.

 

LEAVE A REPLY

*