स्वच्छता संस्कार रुजवावे – प्रविण जाधव

0
प्रविण जाधव
मुळातच वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थानामुळे तसेच मुबलक पाणी, आल्हाददायक वातावरण, धार्मिक व सांस्कृतिक वारसा तसेच दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोदावरीचे सान्निध्य यामुळे नाशिकचा विकास झपाट्याने झाला आहेच. वेळोवेळी कुशल प्रशासक व दूरदृष्टी असलेले लोकप्रतिनिधी लाभल्याने नाशकातील मूलभूत सोयीसुविधांचे जाळे देखील मजबूत आहे.
आज भारताची ‘वाईन राजधानी’ म्हणूनही जागतिक स्तरावर नाशिक शहर, आपल्या नावाचा ‘ब्रँड’ तयार करीत आहे. एकूणच गत काही काळापासून नाशकातील धार्मिक पर्यटन व कृषी पर्यटन असो किंवा नाशिकची खाद्य संस्कृती असो, ती देश-विदेशातील व परराज्यातील पर्यटकांना आकर्षित करण्यात निश्‍चितच यशस्वी ठरली आहे. अशा वेळी, पर्यटकांपुढे आपल्या अर्थात नाशिकच्या धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक वारश्याचे ‘ब्रॅण्डिंग’ करताना शहराची ‘स्वच्छता’ व ‘प्रदूषणाची पातळी’ हे कळीचे मुद्दे ठरतात.
भारताला जागतिक बाजारपेठेत महत्त्वाचे स्थान मिळावे म्हणून ‘मेक इन इंडिया’चा पुरस्कार करताना, त्याच्या पार्श्‍वभूमीवर ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवण्याची गरज केंद्र सरकारला वाटते, यावरूनच आपल्याला शहराच्या स्वच्छतेचे महत्त्व कळते. ‘पर्यावरण व त्याचे संवर्धन’ हा आज जागतिक पातळीवर चर्चिला जाणारा मुद्दा आहे. त्यात जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण तसेच स्वच्छता व इतर संलग्न बाबींचा समावेश होतो व हा विषय जागतिक स्तरावर मोठ्या गंभीरतेने हाताळला जात आहे.
आज अनेक मोठ्या प्रकल्पांसाठी, पर्यावरण खात्याची मंजुरी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळेच पर्यावरण व स्वच्छतेशी संबंधित विषय प्राधान्यक्रमाने हाताळणे ही काळाची गरज आहे. ‘राष्ट्रीय हरित लवादाने’ लादलेल्या निर्बंधांमुळे नाशिकातील विकासकामे ठप्प पडली याला आपण सगळेच साक्षी आहोत. गोदावरीचे पाणी पिण्यालायक नाही, हा मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाने सोमेश्‍वर येथे लागलेला फलकदेखील, आपल्याला निश्‍चितच भूषणावह नाही. ही अस्वच्छता किंवा जलप्रदूषण एकाएकी झाले आहे, असेही नाही.
आपल्या अनेक वर्षांपासून वापरात असलेल्या चुकीच्या सवयींचा व पद्धतींचा हा परिपाक आहे. त्यामुळेच स्वच्छतेच्या बाबतीत केवळ शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांवर अवलंबून न-राहता, प्रत्येक नाशिककराने आपापले योगदान देवून शहराच्या स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लावण्यास मदत करणे, तसेच स्वच्छता अभियानांमध्ये जास्तीत जास्त लोकसहभाग वाढवणे याशिवाय दुसरा पर्याय नाही. तसेच यामुळे आपला परिसर स्वच्छ व प्रदूषणमुक्त होवून, ‘स्वच्छ भारत अभियानात’ आपल्या नाशिक शहराचा क्रमांक अधिकाधिक चांगला यावा आणि नाशिक शहराच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला जावा, असाही एक प्रयत्न करणे आपल्याला शक्य होणार आहे.
ही ‘स्वच्छता चळवळ’ संपूर्ण नाशकात वाढीस लागावी व नागरिकांमध्ये स्वयंशिस्त व स्वच्छतेविषयीची आस्था वाढीस लागण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे देखील याठिकाणी गरजेचे ठरणार आहे. प्रशासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनादेखील या बाबींकडे पुरेश्या गांभीर्याने पहावे लागणार आहे.
याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून दिंडोरी रोड येथील आमच्या गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळाने देखील पुढाकार घेऊन, लोकसहभागातून नियमित स्वच्छता मोहीम राबवणे, वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करणे यांसारखी पावले उचलत, एक ‘स्वच्छता चळवळ’ सुरू करण्याच्या छोटेखानी प्रयत्नास सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

*