Type to search

Special माझं नाशिक

भविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप

Share
ऐतिहासिक पुरातन वारसा असलेले ‘आपलं नाशिक’ आता उद्योगनगरी आणि शैक्षणिक नगरी म्हणून सर्वदूर परिचित झाले आहे. सुवर्ण इतिहास असलेल्या नाशिकचा भविष्यकाळसुद्धा सुवर्ण व्हावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. वर्षभर असलेल आल्हाददायक, आरोग्यदायी हवामान आणि पायाभूत सुविधा यामुळे नाशिक भारतातील राहण्यायोग्य शहरात अग्रभागी आहे.
मूळ मंत्रभूमी म्हणून असलेली नाशिकची ओळख आणि संस्कृती याचे महत्त्व अबाधित ठेवून नाशिकचा स्मार्ट विकास होणे गरजेचे आहे. नाशिकला चहूबाजूने निसर्गसौंदर्य लाभलेले आहे. यामुळे पर्यटन व्यवसायाला शहरात मोठे भविष्य आहे. गिर्यारोहणाचे आकर्षण असलेले कळसुबाई शिखर, कोकणकडा, साल्हेर, मुल्हेर अशी अनेक स्थळ नाशिकहून सोयीस्कर पडतात.
गिर्यारोहणाची माहिती आणि प्रशिक्षण देणारी संस्था नाशिकमध्ये निर्माण होऊ शकते, त्याद्वारे गिर्यारोहकांचे आकर्षण वाढीस लागून स्थानिकांना रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते. सांस्कृतिक पर्यटनास नाशिकला अपार संधी आहे. समृद्ध असा धार्मिक आणि पौराणिक वारसा आपल्या गोदामाईला लाभला आहे.
त्र्यंबकेश्‍वर, सप्तशृंगी वणीगड, कपालेश्‍वर, काळाराम मंदिर, तपोवन आदी ठिकाणांना विशेष महत्त्व असून याठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येतात. स्थानिक युवक-युवतींना योग्य प्रशिक्षण दिल्यास अनेक स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होईल. नाशिकला खाद्यसंस्कृती लाभलेली आहे. स्थानिक पदार्थांचे मार्केटिंग केल्यास व्यवसायाला पर्यटनाच्या माध्यमातून चांगले दिवस येऊ शकतात.
कुसुमाग्रज, दादासाहेब फाळके, वि. दा. सावरकर, वसंत कानेटकर आदींनी नाशिकला साहित्य आणि चित्रपट क्षेत्राला समृद्ध वारसा दिला असल्याने याठिकाणी सांस्कृतिक विद्यापीठाची उभारणी केल्यास कला क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणार्‍या विद्यार्थ्यांना ज्ञानसाधनेची व कलासाधनेची व्यवस्था होऊ शकेल व सांस्कृतिक वारसा जतन आणि समृद्ध करण्यास हातभार लागेल.
वाढती विद्यार्थी संख्या लक्षात घेता स्वतंत्र विद्यापीठ आवश्यक आहे. शहराची लोकसंख्या आणि शहराची वाढ यांचे गुणोत्तर लक्षात घेता भविष्यातील सार्वजनिक दळणवळणाच्या व्यवस्थेच नियोजन आत्तापासूनच करायला हवे, जेणेकरून मुंबई-पुणे मेट्रो बांधकामाला होणारी अडचण व नागरिकांची गैरसोय नाशिकमध्ये टाळता येऊ शकते.
नाशिकला लाभलेले निसर्गाचे वरदान यामुळे असणारे अल्हाददायक वातावरणाला धक्का लागणार नाही, यासाठी नगरविकास विभागाने आराखडा तयार करणे गरजेचे आहे. शहरातील गोदापार्क, पेलिकन पार्क, फाळके स्मारक या प्रकल्पांनी शहराच्या सौंदर्यात भर घातली होती. मात्र, कालांतराने या प्रकल्पांची दुर्दशा झाली.
शहरात जागोजागी मनपाचे भूखंड आहेत, त्यावर असलेल्या उद्यानाकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने त्यांना भकास रुप आले असून भविष्यात १) लोकाशाहीचे महत्त्व आणि रचना यांची माहिती देणारे उद्यान, २) विविध शासकीय योजनांची माहिती, ३)छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती व गडकिल्याची माहिती, ४) भारताची भौगोलिक रचना, पर्यटनस्थळांची माहिती, ५) शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिक्षण, आहार व्यवस्थापन, नागरिकांची कर्तव्ये यांची माहिती देणारी उद्यानांची निर्मिती केल्यास हवामान संतुलीत राहिल.
त्यासोबतच प्रबोधनही होईल व पर्यटनास हातभार लागेल. भारत हा युवकांचा देश आहे, पण या युवावर्गाला रोजगार उपलब्ध झाला नाही तर या युवावर्गाला नियंत्रीत करणे, हा व्यवस्थेपुढील मोठा प्रश्‍न भविष्यात असेल. त्यामुळे नाशिकमध्ये शासकीय व खासगी मोठे उद्योग यावे, यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. नाशिकला रेल्वे जॅक्शन होऊन शेतीमालाची दळणवळणाची व्यवस्था निर्माण झाली तर यामुळे शेतमालाला योग्य भाव मिळतील.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!