प्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे

0

प्राचीन काळापासून कुंभमेळा नाशिक नगरीत दर बारा वर्षांनी होत असल्यामुळे आध्यात्मिक मंत्रभूमी ही खरी नाशिकची ओळख होती. याचबरोबर उत्तम हवामान आणि अनुकूल वातावरणामुळे नाशिकची यंत्रभूमी औद्योगिक नगरी झाली. केवळ चाळीस हजार लोकवस्तीचे हे गाव आज वीस लाख लोकांचे महानगर झालेय. माझ्या गेल्या चार पिढ्या आध्यात्मिक कार्यात असल्यामुळे मंत्रभूमी ते यंत्रभूमीचा हा नाशिकचा प्रवास जवळून पाहतोय. त्यामुळे आधुनिकतेचे वास्तव आणि अपेक्षा यात मेळ असणे आवश्यक वाटतेय.

या नगरीची प्राचीनता जपणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच आधुनिक सोयी आणि सुविधा यांचाही समावेश आवश्यक आहे. प्राचीनता जपण्याच्या दृष्टीने गोदावरी नदी प्रदूषणविरहित आणि प्रवाही असावी. जगभरातून येणार्‍या भाविकांना नतमस्तक होताना कृथार्थ वाटावे, असे वातावरण नदीकाठी असावे.

अस्वच्छता, कचरा, घाण यांना थारा नको. प्रशासनास काही अडचणींमुळे लक्ष देणे शक्य नसेल तर गोदावरी संवर्धनासाठी स्वतंत्र प्राधिकरण नेमल्यास नगरी आधुनिक होईल, यात शंका नाही. कारण अनेक प्रश्‍नांची उत्तरे त्यात सापडतील आणि प्राचीनता आणि आधुनिकतेची संगम झालेला दिसेल. याचबरोबर महापालिका क्षेत्रात २४ तास वीज, पाणी, इंटरनेट सेवा उपलब्धता असावी.

आधुनिक सुविधामध्ये राहण्याची उत्तम सोय होण्यासाठी कमी दरातील, मध्यम दरातील लॉज हॉटेलचा समावेश असावा. चविष्ट खानपान मिळेल अश्या वाजवी दरातील हॉटेलची माहिती सुद्धा उपलब्ध असावी. प्रवासी वाहतूक व्यवस्था यावर पण लक्ष केंद्रित करणे अतिशय आवश्यक आहे. तीर्थक्षेत्री प्रवासी आणि ऑटो यांचे रोजचे वाद प्रसंग फार दुर्दैवी आहेत.

शहराची लोकसंख्येबरोबर गुन्हेगारीचे प्रमाणही वाढतेय. दुसरीकडे पोलिसांची संख्या त्या तुलनेत कमी असल्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे. यासाठी इंटरनेट प्रशिक्षित पोलीस ठाण्याची संख्या वाढवणे गरजेचे आहे. जेणेकरून गुन्हेगारीस आळा बसेल.

नाशिकमध्ये प्राचीन मंदिरांची भूमी तिथले पावित्र्य आणि स्वच्छता, आध्यत्मिक प्रसन्न वातावरण राहील, असा परिसर असावा. तसेच सद्य स्थितीतील विश्‍वस्त आणि पुजारी यांचे वाद मिटावेत, जेणेकरून येणार्‍या भाविकांना सुविधा उपलब्ध होतील.

 

LEAVE A REPLY

*