भाविकांसाठी सुविधा हव्या! – चंद्रशेखर पंचाक्षरी

0
चंद्रशेखर पंचाक्षरी
नाशिक तीर्थक्षेत्र असल्याने जगभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. नगरीला धार्मिक, ऐतिहासिक व पौराणिक दृष्टिकोनातून अनन्य साधारण महत्त्व आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून शहराचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत गंगा- गोदावरी परिसरांतील तीर्थक्षेत्रावर परंपरेनुसार ३५० घरे ही पौरोहित्य करणारी असून यांच्याकडे ५०० वर्षांपूर्वीच्या विविध प्रांतातील तसेच भाषेतील लोकांच्या वंशावळी त्यांनी जतन करून ठेवलेल्या आहेत.
विधीसाठी येणारे भाविक हे पौराहित्यांना संपर्क साधून येत असतात. त्या पुरोहितांसाठी तसेच हे बाढ सांभाळण्यासाठी ऊन, वारा, पाऊस यापासून याचे संरक्षण व्हावे. तसेच पुढील शेकडो वर्षे याचे जतन व्हावे, यासाठी अत्याधुनिक संपर्क तसेच माहिती कार्यालय असावे. तीर्थक्षेत्रावर धार्मिक विधी, पर्वणी काळात येणार्‍या महिला व पुरुषांची गर्दी असते. स्नानानंतर विशेष करून महिला वर्गासाठी वस्त्रांतर गृहाची निर्मिती व्हावी. भाविकांना मौल्यवान साहित्य ठेवण्यासाठी लॉकर्स व्यवस्था, अंध-अपंग भाविकांसाठी व्हीलचेअर व स्वतंत्र मार्ग असावा.
दशक्रिया, अस्थि विसर्जन अश्या धार्मिक विधीसाठी येणार्‍या भाविकांची संख्या लक्षणीय असून पूजेप्रसंगी ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावे, यासाठी विधीशेड आवश्यक आहे. पैठणच्या धर्तीवर विधी कम्पार्टमेंट असावेत. हिंदू धर्मामध्ये दशक्रियेच्या दिवशी काकस्पर्श नावाचा धार्मिक विधी महत्त्वाचा मानला जातो. काकस्पर्श म्हणजे पिंडाला कावळा शिवणे, हा भावनिक विषय आहे.
परंतु आजमितीस भाविकांना तासन्तास उभे रहावे लागत असल्याने यासाठी स्वतंत्र जागी काकस्पर्ध पारची निर्मिती व्हावी. त्याठिकाणी वृक्षारोपण केल्यास कावळ्यांचे प्रमाण वाढेल. श्राद्ध कर्मानंतर गाईला गोग्रासचे हिंदू धर्मात महत्त्व असल्याने त्याठिकाणी गोशाळेची निर्मिती व्हावी. अस्थिविसर्जनाला वेगळे महत्त्व असून रामकुंड येथे अस्थिविलय कुंड आहे. तसेच पिंड विसर्जनासाठी एक जागा निश्‍चित केल्यास रामतीर्थ स्वच्छ राहण्यास मदत होईल.
धार्मिक विधी आधी केस वपन केले जाते. त्यासाठी स्वतंत्र जागेत न्हावी पार केला पाहिजे. शेगांवच्या धर्तीवर भाविकांसाठी अल्पदरातील भक्तनिवास व प्रसादालय आवश्यक आहे. गोदावरी नदीचे प्रदूषण हटवून बाराही महिने निखळ वाहते पाणी असावे, यासाठी नियोजन करावे. तीर्थक्षेत्राचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी मांस विक्रीला बंदी घालावी. रामकुंडात अमृताचे थेंब पडल्याचा उल्लेख पुराणामध्ये आहे, म्हणून नाशिकला दर बारा वर्षांनी होणार्‍या कुंभमेळ्यात पर्वणीच्या तारखा तिथी काढणे हे परंपरेनुसार पुरोहित संघ नियोजन करीत असतात.
यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत तेलंगणा, हरिद्वार या राज्याप्रमाणे कायमस्वरुपी आर्थिक तरतूद करावी, तसेच स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करण्याची गरज आहे. नाशिक पुरातन व धार्मिक स्थळ असल्याने येथे वेद पठणाला येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. येथे पुरोहित संघाला वेद पाठशाळेसाठी निवासी इमारत उपलब्ध झाल्यास धार्मिक परंपरा जोपासण्यास अधिकच मदत होईल.

LEAVE A REPLY

*