मोहट्याची रेणुका देवी

मोहट्याची रेणुका देवी

अहमदनगर जिल्ह्यातील देवीमातेचे प्रसिद्ध ठिकाणे या विशेष मालिकेत आपल्याला ओळख करून देणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेले सुप्रसिद्ध स्वयंभू देवी मोहट्याची रेणुकामाता नवरात्रीचे नऊ दिवस हा शक्तिदेवीचा कालखंड म्हणूनच ओळखला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत हा महोत्सव चालतो. हा नऊ रात्रींचा कालखंड म्हणून नवरात्र उत्सव म्हटला जातो. तामसी, क्रूर वृत्तीच्या दुर्जनांचे प्राबल्य जेव्हा भूतलावर वाढते, तेव्हा त्या दुर्जनांपासुन साधू सज्जनांचे रक्षण करण्यासाठी देवी अवतार धारण करते.

देवि त्वं भक्त सुलभे सर्व का़र्य विधायनी ।

कलौ हि कार्य सिध्यर्थ मुपायं ब्रुहि यत्नतः

कलियुगामध्ये ऐहिक व पारलौकीक सुख देणारी, उपासनेद्वारे मानवी जीवनास पूर्णानंद देणारी,महाराष्ट्रातील तीन शक्तीपीठांपैकी, श्रीक्षेत्र माहुरगड निवासिनी रेणुका मातेचा अवतार असणारी स्वयंभू व नवसास पावणारी आई जगदंबा श्री.मोहटागडनिवासीनी श्री. भगवती मोहटादेवी होय.

गर्भगिरी पर्वत रांगेतील उंच डोंगर पायथ्याशी हा दंडकारण्याचा प्रदेश येथे पूर्वी मोहाची खूप झोडे होती म्हणुन गावांस मोहटा गाव असे म्हणतात. गडाच्या दहा दिशांस पवित्र व महामुनींनी साधुसंताच्या तप:श्चर्येने पूनीत झालेली, पुरातन इतिहास असलेली पवित्र क्षेत्रे जसे श्री वृध्देश्वराचे स्वयंभू लिंग, मायंबा येथे श्री मत्स्येन्द्रनाथ व मढी येथे श्री कानिफनाथ यांचे संजीवन समाधी स्थान आहेत. अशा पवित्र पुण्यपावन पुण्यक्षेत्रामध्ये भक्त कल्याणार्थ मोहटा येथे श्री मोहटादेवी अवतीर्ण होऊन प्रसिध्द झाली. मोहटा या गावी देवी स्वयंभू प्रकटली त्यामुळे तिला मोहटादेवी असे म्हणतात. श्रीक्षेत्र मोहटादेवी गडाचा परिसर म्हणजे गर्भगिरी पर्वताच्या रांगेतील होय. याच रांगेतील मोहटा गावालगतच्या उंच अशा डोंगरावर श्री रेणुकामाता प्रगटली. पूर्वीच्या काळी श्री नवनाथांनी शाबरी विद्या कवित्व सिद्धीसाठी भगवान श्री वृद्धेश्वर आदिनाथांना प्रसन्न करुन एक महायज्ञ केला. यज्ञेश्वरी श्रीशाबरी देवी प्रसन्न झाली त्यावेळी सर्व ऋषीमुनी देवगणांनी व नाथांनी आपल्या दिव्य सामर्थ्यांनी देवीस पाचारण केले. तेव्हा देवीने तथास्तु म्हणून वरदान दिले. संत श्री बन्सीबाबा दहिफळे व भक्तगणांना आश्विन शु. एकादशीला देवीने साक्षात्कार दिला.

मोहटा परिसरातील गावोगावच्या अनेक भक्तांना संघटित करुन बाबा श्री क्षेत्र माहुरगडाची वारी करायचे. सर्व संसार, गायीगुरे बरोबर असायची. पायी चालावे, मुखाने जय जगदंब, जय जगदंब असे नामस्मरण, देवी चरित्राचे गुणगान, साधुसंताची चरित्र गाण शुचिर्भूत होऊन नित्य उपासनाकर्म करावे, सदाचरणाने पायी चालावे व मुक्कामी स्थळी कीर्तन भजन करावे अशा दिनचर्येने माहुरगडी पोहचल्यावर मातृतीर्थचे स्नान करुन तीर्थजलाने श्री रेणुकामातेची पूजा, अभिषेक, साडी ओटी व महानैवेद्य पुरणपोळीचा अपर्ण करावा. श्री सप्तशतीपाठ, होमहवण, चंडीयांगाचे आचरण करावे अशी सारी सेवा करुन परत मोहटागांवी यावे. त्यांना जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागायचा, त्यांच्या प्रामाणिक आचरणातुन ।्। आधि प्रपंच करावा नेटका मग परमार्थ सुभटा ॥ ही समर्थांची शिकवण बाबांनी आचरणात आणुन धन्य तो गृहस्थाश्रमम अशी धन्यता मिळवून त्यांनी देवीजवळ अधिकार मिळविला होता. मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवोभव, अतिथी देवो भव ही वेद शिकवण स्वत:च्या अंगी बाणवून यथार्थ प्रयत्नपूर्वक स्वधर्माची ओळख करुन बन्सीबाबा उत्तम जीवन जगले.

माहुरगडाची वारी करतांना बाबा वयोमानाने थकले व त्यांनी श्री रेणुकामातेंची करुणा भाकली. आई, तुझा वियोग होऊ देवू नको, त्याच दिवशी बाबांना दृष्टांत झाला, मी तुझ्याबरोबर आहे अशी आकाशवाणी झाली. त्यावेळी बाबांना विदेही अवस्था प्राप्त झाली. बाबा बाहेरगावी निघाले तेव्हा त्यांचे जवळ असणारी पांढरी देवगुणी गाय हरवली. बाबा हळहळले. गावाकडे आल्यावर कालांतराने ही गाय डोंगर पायथ्याशी आहे, अशी वार्ता बाबांच्या कानी आली तेव्हा सवंगडयासह बाबा गाय धरण्यासाठी आले, तेव्हा गाय डोंगरावर वर वर चढू लागली. पुढे गाय, तिच्या मागे भक्तगण, उंच उंच डोंगर अशा अवस्थेत गाय डोंगराच्या माथ्यावर आली. आणि तिने थांबून पान्हा सोडला. लोक पहातात तो महद्आश्चर्य, ज्या ठिकाणी गाय पान्हावली तिथेच भव्य, दिव्य, सौंदर्य संपन्न तेजोमय देवीचा तांदळा. गाय जणू देवीला दुधाचा अभिषेक करत होती. भक्तगणांनी धन्य झालो असे उद्गार काढून श्री रेणुकेचा जयजय कार उदोकार केला व अतिआनंदाने दर्शन घेतले. पैठणक्षेत्री जावून पायी कावडीने भक्तगणांनी पायी गंगोदक आणुन तीर्थजलाने अभिषेक करुन अन्नदान केले. हा साक्षात्काराचा पुण्यपावन दिन आश्विन शु. एकादशी होय. तेव्हापासून आजपर्यंत हजारो भाविक पायी पैठणहून गंगाजल आणून श्री मोहटादेवीला गंगास्नान घालतात. अश्विन शु एकादशी भक्तगण यात्रौत्सव आयोजित करतात. मोहटागाव ते शक्तीपीठ श्री मोहटादेवी गडापर्यंत भव्य सवाद्य पालखीची मिरवणूक निघते हा पालखी सोहळा देवी प्रकटल्यापासून आजपर्यंत चालू आहे.

नवसाला पावणारी श्री मोहटादेवी रेणुकामातेच्या दर्शनासाठी भक्तगणांची वाढती संख्या, पुरातन असलेल्या मंदीराची अवस्था, भावीकांसाठी सर्वसुखसोयी इत्यादी बाबींचा विचार करुन पुरातन मंदीराचा जीर्णोद्धार होऊन नूतन श्रीयंत्रावर आधारित मंदीराची उभारणी करण्यात आली आहे. श्री यंत्रातील वृत्तत्रयानुसार नुतन मंदीरामध्ये तीन दर्शन रांगेची रचना करण्यात आली आहे. तीन दर्शन रांगेमध्ये श्री महागणपती, श्री गुरुदत्तात्रेय, श्री रुख्मिणी पांडुरग, श्री उमामहेश्वर, श्रीगुरु भगवानबाबा, श्री गुरु वामनभाऊ महाराज, चौसष्ट योगिनी, दशमहाविदया, अष्टभैरव या देवदेवताची प्रतीष्ठा, सुवर्ण कलशारोहण आणि सभागृहामध्ये श्रीयंत्र प्रतिष्ठा सहस्त्रचंडी महायज्ञासह प्रतीष्ठयाग नवकुंडात्मक पद्धतीने विधियुक्त करण्यात आली. असे सर्वानंदमय सर्व देवदेवतासह श्रीयंत्र प्रतीष्ठित असे श्रीयंत्राधारीत श्री मोहटादेवीचे भारतातील एकमेव मंदीर आहे. म्हणुनच साधु संत महात्म्ये यांनी शक्तीपीठ श्रीक्षेत्र मोहटादेवीगड असे नामभिधान दिले आणि आज सुसंस्कारीत धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून अभिनवतेने गडाची महती नावारुपास येऊ लागली आहे.

श्री क्षेत्र मोहटादेवी गडाची वैशिष्ट्ये व उपक्रम - श्रीयंत्र वृत्त त्रयात्मक तीन दर्शनरांगा, दर्शन रांगेमध्ये श्री गणपती, श्री गुरुदत्तात्रेय, श्री रुख्मिणी पांडुरंग, श्री उमामहेश्वर, श्रीगुरु भगवान बाबा, श्रीगुरु वामनभाऊ महाराज, चौसष्टयोगीनी, दशमहाविद्या, अष्टभैरव या देवदेवतांची प्रतीष्ठा केलेली आहे. सभागृहामध्ये यंत्रराज श्रीयंत्र प्रतीष्ठा, सुलभ दर्शन व्यवस्था

संगणीकृत देणगी व्यवस्था, अभिषेक, होमहवन, कुलाचार, कुलधर्म, अर्चनासाठी स्वतंत्र कक्ष सुवासिनी भोजन कक्ष कीर्तन, प्रवचन कक्ष, सुसज्ज प्रसादालय, वाताणुकुलीत विशेष अतिथी कक्ष, अखंडितविद्युत व्यवस्था, स्वच्छ आर ओ पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहे, भक्त निवास, सुरक्षा व्यवस्था, वाहनतळ पार्किंग व्यवस्था,मोहटादेवी गड- पाथर्डी दळणवळण मिनीबस व्यवस्था, अपंग, वृद्ध व्यक्तिंसाठी लिफ्ट व्यवस्था, त्रिकाळ पुजा आरती, सी.सी. कॅमेरे सिस्टीम अद्यावत, वृक्ष लागवड व संगोपन, प्रत्येक पौर्णिमेस कीर्तनाद्वारे समाज प्रबोधण,

तर उद्या भेटू या अहमदनगरच्या बुर्‍हाणनगरची देवी तुळजा भवानीच्या माहितीसह ...

Related Stories

No stories found.