विशेष पॉडकास्ट : पाणी आलं...पाणी गेलं...

विशेष पॉडकास्ट : पाणी आलं...पाणी गेलं...

नाशिक । शुभम धांडे

शहरात मागचे काही दिवस पावसाने हजेरी लावली (Rain in Nashik) आणि पुन्हा नेहमीच्या चर्चेला उधाण आले, आता धरणसाठ्यात पाणी (Dam water level increased) वाढलेले दिसते, म्हणजे पाणी सोडतीलच येवढ्यात तसंच झालं, गंगापूरमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि सुरू झाला त्याचा प्रवास. बघता बघता पाणी गोदाघाट परिसरात पोहोचले, तशा बातम्या शहरात फिरू लागल्या. मारुतीला पाणी लागले. आता मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलय.

दुतोंड्या कंबरेपर्यंत बुडाला. आता पूर येणारे म्हणून काही हौशी नाशिककर बघ्यांची होळकर पूल, रामसेतू, गडकरी पुलावर गर्दी जमू लागली. एकीकडे बघे पुराचे रौद्र रूप पाहण्यात, त्याचा आनंद घेण्यात दंग तरी दुसरीकडे मात्र गंगेतीरी छोटे, मोठे व्यावसायिकांची आहे नाही ते सामान सुरक्षित ठिकाणी नेण्याची धावपळ सुरू होती. पाणी आता पुराचा संकेत देणार्‍या दुतोंड्या मारुतीच्या छातीला येवून टेकले आणि बघता बघता रामसेतूवर उभ्या असलेल्यांच्या पायाला पाण्याचा प्रवाह जाणवू लागला. कारण पाणी पुलाच्या खालच्या बाजूला आदळून पुढे जात होते. अजून तरी पुराची व्यापकता महापुराइतकी नव्हती, पण गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरे, दुकान पाण्याने अर्धे अधिक झाकले गेले होते....

हे सगळे दृश्य पाहण्याची नाशिककरांची आवडती जागा होळकर पूल. पुलावरून एकीकडे विस्तीर्ण लाटांनी स्वार खळखळलेली गोदामाई पाहताना पुलाच्या दुसर्‍या बाजूला हीच गोदामाई एका वादळा आधीच्या शांततेप्रमाने संथ वाहताना पाहून पहिल्यांदा हे दृश्य बघणार्‍यांचा नाही म्हटले तरी गोंधळ उडतो. पण ही काही भुताटकी वगैरे काही नाही तर आर्किटेक्चर रचनेमुळे झालेला चमत्कार आहे.

हे सगळे एका स्तरापर्यंत ठीक असताना त्यापुढे जावून विकासाच्या नावावर गोदावरीच्या श्वासावरच घाव घालाणार्‍या सिमेंट काँक्रीट बांधकामांनी तिला तिच्या इच्छेविरुद्ध लोकांच्या हालअपेष्टाचे कारण व्हावे लागतेय. हे कोणत्याही बघ्याला कळल्यावाचून राहत नाही. कारण हल्ली थोड्याशा पावसाने ही गोदावरीला पूर येतो असे सहज बोलले जाते. या सगळ्यात त्यांची झळ बसते ती स्थानिक रहिवाशी, दुकानदारांना आणि किंबहुना गोदावरीला. हो, गोदावरीलाच.

कारण पाणी आलं की, खळखळणारी गोदामाई (Godavari River) सगळ्या परिसराला अक्षरशः धुवून टाकते आणि पाणी गेले की उधडलेल, गाळाने विद्रुप झालेले आणि नको त्या वाहून आलेल्या घाणीमुळे नदीचे खालावलेले रूपडे पाहताना मन दुखावून जाते.

पण पुढे काय? पाऊस पडणार, तो पडलाच पाहिजे. ती गरज आहे. धरण भरणार, तिही भरलीच पाहिजे. कारण तीसुद्धा गरजेची आहे. धरण ओव्हरफ्लो होईल, पाणी सोडले जाईल, पूर येईल आणि इतर वेळी जीवनवाहिनी, नाशिकचा आत्मा असलेली गोदामाई या आपल्यातीलच काही अविचारी मानवनिर्मित संकल्पनातून उभारलेल्या पात्रामार्गे नाईलाजास्तव जनजीवन विस्कळीत करत वाहत राहिल.

कारण ती तिचे वाहण्याचे काम करतेय, पण, आपण जोपर्यंत तिच्या रस्त्यात आडवे येत राहू, तोपर्यंत दरवेळी आता मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलेय, दुतोंड्या मारूती कंबरेपर्यंत बुडाल्याच्या चर्चा, बातम्या तशाच सुरू राहतील, हे चित्र बदल नाही तर कदाचित एक दिवस नदीच्या ह्या पुराने तिचे पात्र सोडून संपूर्ण शहराला कवेत घेतलेले असेल. तेंव्हा मात्र पाणी आलं.. पाणी गेलं... मन ओल, डोक सुन्न झालं अन् डोळ्यांनी नुसते बघत नाशिककर सुन्न झाले, हे वास्तव असेल.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com