कृतीशील पर्याय गरजेचे!

कृतीशील पर्याय गरजेचे!

भारतात 31 जुलै 1995 रोजी पहिला मोबाईल दूरध्वनी केला गेला. 1998 सालापर्यंत मोबाईलचे आठ लाख ग्राहक होते. आता तीच संख्या एकशेवीस कोटींच्याही पुढे गेल्याचे सांगितले जाते. पहिल्यावहिल्या मोबाईल दूरध्वनीची बातमी माध्यमात झळकली तेव्हा लोक आश्चर्यचकीत झाले होते. मोबाईल विकत घेण्याचे स्वप्न तेव्हा प्रत्येकाने पाहिले होते. पण त्याच मोबाईलचे व्यसनात रुपांतर कधी झाले ते लोकांच्या लक्षातच आले नाही. हे व्यसन प्रसंगी जीवघेणे बनत आहे की, या मुद्यावरुन मुलांनी पालकांचा जीव घेतल्याच्या घटना अधूनमधून घडतात. भारतीय लोक मोबाईलवर किती वेळ घालवतात हा सर्वेक्षणाचा विषय आहे. मोबाईल हे संपर्काचे साधन आहे याचा विसर लोकांना पडला आहे. मोबाईलचे फायदे आणि तोटे वेगळे सांगायला नकोत. ते सर्वज्ञात आहेत. पण ‘कळते पण वळत नाही’ अशीच अवस्था आहे. सुरुवातीच्या काळात स्वखर्चाने मोबाईल घेण्याचा प्रयत्न माणसे करत होती आणि आता मोबाईलचे व्यसन सोडवण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत आहेत. मोबाईलमुक्त एक दिवस असे अभियान सामाजिक संस्था राबवत आहेत. मानसोपचार तज्ञांकडे सल्ला घेणारांची गर्दी वाढत आहे. मोबाईल वेडाचे विद्यार्थ्यांवर गंभीर दुष्परिणाम होतात. मुलांमध्ये एकटेपणा, अस्वस्थता, भीती, निराशा वाढते. भावनिक दृष्ट्या मुले अस्थिर होतात. जागरण वाढल्याने झोपेची समस्याही वाढते. मनाची एकाग्रता ढळते. मुले वास्तवापेक्षा आभासी जगात जगतात आणि रमतात. तेच जग त्यांना खरे वाटू लागते. वास्तवातील जगणे निरस वाटू लागते. सर्जनशीलतेला आणि कल्पनाविलासाला गंज चढतो. हे टाळण्यासाठी राज्यातील गावे एकत्र येत आहेत. शाळा स्तरावर अनेक प्रयोगशील शिक्षक प्रयत्न करत आहेत. पाळधी हे जळगाव जिल्ह्यातील एक गाव. गावातील शाळेच्या मुख्याध्यापकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. मोबाईलचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगून ते थांबले नाहीत. विद्यार्थ्यांच्या सवयी बदलण्याला त्यांनी प्राधान्य दिले. पहाटे लवकर उठून व्यायाम व अभ्यास करण्याची सवय विद्यार्थ्यांना लावली. पहाटे उठल्यावर सरांना फोन करण्याचा आणि अभ्यास करतानाचा सेल्फी टाकण्याचा दंडक विद्यार्थ्यांना घालून दिला. अभ्यास झाल्यावर देखील विद्यार्थी फोन करतात. शाळेत आल्यावर मुलांनी पहाटे केलेला अभ्यास मुख्याध्यापक परत तपासतात. मुलांचा अभ्यास सुधारला असून मोबाईलपासून दूर राहायला विद्यार्थी हळूहळू शिकत आहेत असे मुख्याध्यापकांनी माध्यमांना सांगितले. अनेक ग्रामपंचायती स्वेच्छेने निर्णय घेत आहेत. यवतमाळमधील बांशी गावात अठरा वर्षाखालील मुलांना मोबाईल वापरावर बंदी आहे. धाराशीव मधील जेकेकूर वाडीमध्ये संध्याकाळी दोन तास मोबाईल वापरावर बंदी आहे. असेच अनेक उपाय तज्ञ सुचवतात. एखादी सवय किंवा व्यसन सोडवणे सहज शक्य नसते. त्याचा कालावधी व्यक्तीगणिक बदलू शकतो. व्यसनी माणसाच्या मनपरिवर्तनासाठी सातत्याने सामुहिक आणि वैयक्तिक पातळीवर ज्याच्या त्याच्या परीने प्रयत्न करत राहाणे हाच व्यवहार्य उपाय आहे. मुख्याध्यापक, ग्रामपंचायत सदस्यांनी मुलांना मोबाईलपासून काही काळ दूर ठेवण्याचे कृतीशील पर्याय शोधले. ते अंमलात आणले. सामाजिक पातळीवर देखील असे पर्याय शोधले जायला हवेत. 

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com