पूर्वी कार्यकर्ते निष्ठावान होते…! ; दादा पाटील शेळके यांच्याशी संवाद

0
ज्ञानेश दुधाडे
अहमदनगर – वयाच्या 21 व्या वर्षी 1962 ला राजकारणात प्रवेश झाला. जिल्हा परिषदेला निवडून आल्यावर पुढे सभापती, सलग चार वेळा आमदार, दोनदा खासदार, जिल्हा बँकेचा अध्यक्ष ही पदे भूषाविण्याची संधी मिळाली. मात्र, राजकारणात आणि समाजकारणात मिळालेले यश हे कार्यकर्त्यांच्या जिवावरचे होते. त्यावेळी कार्यकर्ते निष्ठावान होते. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. राजकारणाचा बाजार झालाय, अशी खंत दादा पाटील शेळके यांनी ‘सार्वमत’शी बोलतांना व्यक्त केली. नगरला आज (रविवारी) दादा पाटील शेळके यांच्या सर्वपक्षीय अमृतमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दादा पाटील यांच्या राजकीय, सामाजिक कार्यकाळाबाबत त्यांच्याशी संवाद साधण्यात आला.
नगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची आणि एमएसइबीची (विजेची) कामे केली. पण तालुक्याला बागायत करण्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. मुळात नगर शहर आणि तालुका उंच भागावर वसलेला असल्याने कोणत्याही प्रकारे पाटपाणी नगर तालुक्यात आणता येऊ शकत नाही. यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांनी आता सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्याची वेळ आली असल्याचे शेळके यांनी स्पष्ट केले. 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत वसंतदादा पाटील हे माझे आदर्श आणि गुरू होते. स्वत:चा मतदारसंघ सोडून कधीही जिल्ह्याच्या राजकारणात लुडबूड केली नाही. दक्षिणेत स्वयंपूर्ण नेता असल्याने जिल्ह्यात कधीही कोणाची राजकीय मदत घेण्याची वेळ आली नाही, असे शेळके यांनी सांगितले.
प्रश्‍न : अलीकडच्या काळात राजकारणाबद्दल काय वाटते?
– पूर्वी कार्यकर्ते निष्ठवान होते. आताच्या काळात निष्ठावान कार्यकर्ते राहिलेले नाहीत. कार्यकर्ते एका दिवसात दोनदा पक्ष बदलत आहेत. यापेक्षा वाईट म्हणजे राजकारणात प्रभाव वाढला आहे. मी 1962 ला राजकारणात आलो. त्यावेळी सायकलवर फिरून प्रचार करायाचो. कार्यकर्ते घरून भाकरी घेऊन येत आणि प्रचारात सहभागी होत. आता तशी परिस्थिती राहिली नाही. राजकारणाचा बाजार झालाय.
प्रश्‍न : नगर दक्षिणेत कशाच्या जोरावर एवढ्यावेळा विजय संपादन केला?
– मी राजकारणाला सुरुवात केली तेव्हा विकास कामाला महत्त्व होते. राज्यातील आमदार, मंत्र्यांच्या सर्वसामान्यांना कसा फायदा होईल याकडे कल असायचा. विकास कामे सोडून अन्य कशाला महत्त्व नव्हते. आता विकासाला महत्त्व राहिलेले नाही. पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जात आहेत. मुद्द्याचे राजकारण सोडून सर्व सत्तास्थाने आपल्याकडे पाहिजेत, यासाठी राजकारण करण्यात येत आहे.
प्रश्‍न : नगर तालुक्यासाठी काय केले?
– 1962 ते 1978 या काळात जिल्हा परिषदेत काम करण्याची संधी मिळाली. सदस्य म्हणून काम करताना नगर दुष्काळी तालुक्याचे चित्र पालटण्यासाठी गाव तेथे तलाव बांधण्याचा निर्णय घेतला आणि त्यावर प्रभावीपणे अंमलबजावणी केली. यामुळे तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटला. पुढे चार वेळा आमदारी की असताना तालुक्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारण आणि विजेचा प्रश्‍न कमी करण्यासाठी एमएसइबीचा प्रश्‍न हाती घेतला. याचा फायदा तालुक्यातील सर्वसामान्य शेतकर्‍यांना झाला.
प्रश्‍न : कार्यकर्त्यांच्या सक्षमीकरणासाठी काय केले?
– आपला मतदारसंघ आणि जिल्ह्याचा दक्षिण भाग सोडून जिल्ह्यातील उर्वरीत मतदारसंघांची पंचायत (हस्तक्षेप) कधी केली नाही. अपक्ष म्हणून निवडून आलेला असल्याने काँग्रेस पक्षाने नेहमी पाठिंबा दिला. तत्कालीन सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांचे विशेष सहकार्य लाभले. विशेष करून वसंतदादा पाटील यांना राजकारणातील आदर्श मानत असून शरद पवार यांचे राजकारणात मोठे सहकार्य लाभले. शेतकर्‍यांची भविष्यात गरज ओळखून नगर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून त्यांना हक्काची बाजारपेठ मिळवून दिली. जिल्हा बँकेत अध्यक्ष असताना जिल्हाभर शाखांचे जाळे उभारण्यासोबत नगर तालुक्यात 37 माध्यमिक शाळा सुरू केल्या. या शाळा एका छताखाली न आणता त्या त्या गावातील कार्यकर्त्यांच्या ताब्यात दिल्या. यातून कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न केला.
प्रश्‍न : आजच्या तरुण पिढीला काय संदेश देणार?
– आजच्या तरुण पिढीने राजकारणाकडे विकासाचे साधन म्हणून पाहावे, पैसा कमावण्याचे साधन म्हणून नव्हे. आजच्या तरुणांनी गावाच्या विकासात लक्ष घालवे. गावाचे प्रश्‍न कशा प्रकारे गावात सोडविता येतील यावर भर द्यावा. संघटना वाढवावी, गाव हा घटक डोळ्यासमोर ठेवून काम केल्यास विकास लांब नाही, अशी भूमिका शेळके यांनी या निमित्ताने व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*