डी.एड. अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ

0

गुरूजी होता का गुरूजी? संस्थाचालक शोधताहेत विद्यार्थी

संदीप वाकचौरे
गणोरे – गुरूजी होता का गुरूजी? असे म्हणत प्रवेशासाठी मुलांच्या मागे लागण्याची वेळ आता संस्थाचालकांवर आली आहे. राज्यात बारावीचा निकाल लागल्यानंतर शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रमासाठी प्रेवश प्रक्रीया ऑनलाईन सुरू करण्यात आली आहे. मात्र फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अहमदनगर जिल्हयातील एकूण सुमारे दोन हजाराहून अधिक जागांसाठी अकरा दिवसांत केवळ सतरा अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमाचे भविष्य टांगली लागल्याचे चित्र आहे.
अहमदनगर जिल्हयात एकूण 38 अध्यापक विद्यालय असून त्यातील शासकीय अध्यापक विद्यालय संगमनेर, जामगाव अध्यापक विद्यालय, सेंट मोनिका अध्यापक विद्यालय, महाराष्ट्र अध्यापक विद्यालय, अ.य सोसायटी अध्यापक विद्यालय अनुदानित असून उर्वरीत 33 अध्यापक विद्यालय विना अनुदानित आहेत. यापूर्वी अहमदनगर जिल्हयात 67 अध्यापक विद्यालय होती. तुकडयांची संख्या सुमारे 72 आसपास होत्या. जिल्हयात मराठी व इंग्रजी दोन माध्यमातील अध्यापक विद्यालय आस्तीत्वात आहेत.
राज्यात सुमारे लाखभर विद्यार्थ्याची प्रवेश क्षमता असतांना नुकत्याच झालेल्या परीक्षेला केवळ सोळा हजार विद्यार्थी प्रविष्ठ झाली होती. विद्यार्थी मिळत नसल्यांने अनेक ठिकाणी शुन्य प्रवेश असल्यांने अनेक संस्था चालकांनी स्वतःहून बंद करण्यासाठी प्रस्ताव सादर केले होते. राज्यात सुमारे आठशेपेक्षा अधिक अध्यापक विद्यालयांना कुलूप लावण्यात संस्था चालक यशस्वी झाले आहेत.
राज्यात गत काही वर्षात शिक्षक भरती प्रक्रीयाच होत नसल्याने व सध्या सहा लाखापंर्यत पदवी प्राप्त छात्र अध्यापक असल्याने त्यांनाच नोकरी उपलब्ध नाहीत. त्यात नव्याने भरती करीता सरकारचे निर्बंध , शिक्षण हक्क कायद्याच्या आस्तीत्वानंतर शिक्षक पात्रता परीक्षा परीक्षेची झालेली सक्ती.
त्या परीक्षेची असलेली काठीण्य पातळीमुळे उत्तीर्णतेचे असलेले अंत्यत कमी प्रमाण लक्षात घेता गुरूजी होणे नको रे बाबा असे म्हणत अनेकांनी पाठ फिरवली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा दरवर्षी घेण्यात येते आहे. केंद्रीय पात्रता परीक्षेत अवघे एक टक्का विद्यार्थी उत्तीर्ण होत असून राज्याच्या पात्रता परीक्षेतही निकालाचा टक्का दोन ते अडीचच्या पुढे जात नसल्याचे चित्र आहे.
सध्या शासनाने शिक्षक भरतीची गरज व्यक्त केली आहे. त्या भरती प्रक्रीयेचा विचार करता यावर्षी प्रवेश प्रक्रीयेस प्रतिसाद मिळेल असा कयास होता पण त्या कयासाला फारसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. शिक्षणशास्त्र अध्यापक विद्यालयाकरीता विद्यार्थी मिळत नसल्याने या वर्षी देखील काही अध्यापक विद्यालयांना थांबावे लागेल असे चित्र आहे. विद्यार्थ्यांनी केलेले दुर्लक्ष, पालकांनी केलेली डोळेझाक पहाता या अभ्यासक्रमाला भविष्य तरी उरेल काय असा प्रश्न उपस्थित केला आहे.
सध्या शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया सुरू आहे.ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर संगमनेर येथील जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, व अहमदनगर येथे महाराष्ट्र अध्यापक विद्यालय येथे पडताळणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदरचे अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 18 जून 2017 अखेरर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.

लाखभर प्रवेश क्षमता असताना पंधरा टक्के जागा भरणेही झाले अवघड
अऩेक ठिकाणी संस्थाचालकांनी लावले टाळे
काही ठिकाणी दहा बारा विद्यार्थ्यांवर सुरू आहेत विद्यालय
अऩुदानित अध्यापक विद्यालये देखील अडचणीत
खाजगी संस्थाचालक नातेवाईकांच्या शोधात
अनेक शिक्षकांना विद्यार्थी शोधण्यासाठी करावी लागते वणवण
राज्यशासनाच्या विनंतीकडे एनसीटीने पाठ फिरविल्याने अध्यापक विद्यालयांना वाईट दिवस

LEAVE A REPLY

*