Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेश‘निसर्ग’ कोपणार! अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर

‘निसर्ग’ कोपणार! अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर

सार्वमत

मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

- Advertisement -

मुंबई – अरबी समुद्रातील  कमी दाबाच्या पट्ट्याचे आता चक्रीवादळात रुपांतर झाले असून निसर्ग हे चक्रीवादळ आगामी बारा तासांमध्ये अजून तीव्र होणार आहे. तेथील वार्‍याचा वेग ताशी 100 ते 110 किमी एवढा असेल. 120 पर्यंत देखील तो पोहोचण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याच्या मुंबईच्या दक्षता अधिकारी शुभांगी भुते यांनी दिली आहे.

भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईपासून 430 किमी दूर तर गोव्यापासून 280 किमी दूर हे चक्रीवादळ आहे. हे चक्रीवादळ 3 जूनच्या दुपारपासून दमण आणि हरिहरेश्वरपासून अलिबागच्याजवळ रायगड जिल्हा ओलांडण्याची शक्यता आहे. या तीव्र चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, पालघर, मुंबई आणि रायगडमधील काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यावेळी वार्‍यांचा वेग हा ताशी 100 ते 110 किमी असेल. हे चक्रीवादळ या भागातून ज्यावेळी जाईल तेव्हा संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

दरम्यान 2 जून रोजी संध्याकाळी पालघर जिल्ह्याच्या समुद्र किनार्‍यावर निसर्ग चक्रीवादळ तडाखा देईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अर्थात एनडीआरएफच्या 16 तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत. ज्यापैकी तीन तुकड्या मुंबईत, प्रत्येकी दोन पालघर आणि डहाणूत तैनात करण्यात आल्या आहेत. दहा तुकड्यांना किनारी प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये नियुक्त करण्यात आलं आहे.

पंतप्रधान मोदी, अमित शाह यांनी घेतला आढावा – दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निसर्ग वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मंगळवारी आढावा घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करून या चक्रीवादाळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला आहे. वेळ पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी आजूबाजूच्या काही राज्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकडयाही तयार ठेवण्यात आल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे.

फ्लॅश प्लडची शक्यता – निसर्ग चक्रीवादळामुळे केंद्रीय जल आयोगाने सिंधुदूर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे, मुंबई आणि नाशिकमधील काही भागांमध्ये फ्लॅश प्लड म्हणजेच अचानक मोठ्याप्रमाणात आलेला पाण्याचा प्रवाह येण्यासंदर्भातील इशारा दिल्याचेही स्कायमेटने म्हटले आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या किनारी भागांमध्ये तसेच गुजरामध्येही उंच लाटा उसळतील असा इशाराही स्कायमेटने दिला आहे.

गुजरातमध्ये 20 हजार जणांचे स्थलांतर – निसर्ग चक्रीवादळ बुधवारी देशाच्या पश्‍चिम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरात वलसाड आणि नवासरी जिल्ह्यातील किनारावर्ती 47 गावातून सुमारे 20 हजार लोकांना स्थलांतरीत करण्यात आले. हे वादळ जरी गुजरातला धडकणार नसले तरी या भागात जोरदार वादळी वारे वाहू शकतील. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे.  प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नवासरी आणि वलासाडमधून 20 हजार लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या