एकसष्ट वर्षाच्या नाशिककर शिर्के यांची सायकलवर अमरनाथ यात्रा

0

नाशिक ता. २ : नाशिकच्या दीपक शिर्के यांनी ४००० किमीचा प्रवास सध्या सायकलवर केला पूर्ण, नाशिक सायकलीस्टने केले जंगी स्वागत

नाशिक : वय अवघे ६१ वर्षे असलेल्या दीपक शिर्के यांनी आपली अमरनाथ यात्रा करण्याची इच्छा सायकलवर एकट्यानेच प्रवास करत पूर्ण केली आहे. आज (दि.२) नाशिक पुण्यभूमीत आगमन झाले असता नाशिक सायकलीसस्टने त्यांचे जोरदार स्वागत केले.

नाशिक सायकलीस्टचे सदस्य असलेल्या शिर्के यांनी संपूर्ण ४००० किमीचे अंतर त्यांनी सध्या सायकलवर पूर्ण केले हे विशेष. निवृत्त बँकर असलेल्या शिर्के यांनी आपल्या अप्रतिम सामर्थ्यबाबत एक आदर्शच तरुण सायकलिस्टसमोर ठेवला आहे.

शिर्के यांच्या जंगी स्वागतावेळी नगरसेवक अरुण पवार, शांताराम रायते, नाशिक सायकलीस्टचे शैलेश राजहंस, योगेश शिंदे, नाना गायकवाड, रत्नाकर आहेर, संदीप जाधव, मुकेश चव्हाणके, डॉ. नितीन रौदळ, डॉ. मनीषा रौदळ, दत्तू आंधळे, मिलिंद देशपांडे, रवींद्र दुसाने आदी उपस्थित होते.

१३ जून रोजी संकष्टी चतुर्थीला काळारामाचे दर्शन घेऊन ते या यात्रेसाठी रवाना झाले होते. जाताना त्यांनी इंदूर, ओमकारेश्वर, शिवपूर, ग्वाल्हेर, आग्रा, दिल्ली, जम्मू या मार्गाने प्रवास केला. तर परतीचा प्रवास त्यांनी अमृतसर मार्गे गंगानगर, बिकानेर, जयपूर, अहमदाबाद, बडोदा, सापुतारा आणि नाशिक असा पूर्ण केला. जम्मू येथे सायकल ठेवत त्यांनी बाबा अमरनाथ मंदिरासह वैष्णोदेवी मंदिर आदी स्थळांना भेट दिली.

आजपर्यंत अनेकांनी मुंबई, पुणे पासून जम्मू पर्यंतचे अंतर सायकलवर केले असेल मात्र परतीचा प्रवासही सायकलवर पूर्ण करणारे शिर्के हे एकमेव सायकलीस्ट असावेत असे नाशिक सायकलीस्टचे शैलेश राजहंस म्हणाले.

रोज सरासरी ७० ते ८० किमीचा प्रवास करत शिर्के १० जुलै रोजी जम्मू येथे पोचले. संपूर्ण एक आठवडा ते जम्मू काश्मीरमध्ये होते. जम्मू काश्मीर मधील सध्याचे तणावपूर्ण वातावरण बघता मोठ्या हिमतीने त्यांनी दिल्ली जम्मू या महामार्ग क्रमांक १ वरून सायकलवर प्रवास केला.

या सायकल प्रवासाबाबत बोलताना शिर्के म्हणाले की, हा संपूर्ण प्रवास हा विस्मयकारक असाच वाटत आहे. आकाल्पितात कल्पित असते असे म्हणतात असेच काहीसे मी अनुभवले आहे. प्रवासात असताना मित्र, सहकारी, नाशिक सायकलीस्टचे सदस्य,आता  आपल्यात नसलेले जसपाल सिंगजी हे सतत संपर्कात होते.

संपूर्ण प्रवासात कोणत्याही हॉटेलमध्ये न थांबता संध्याकाळ होताच मिळेल तिथल्या मंदिर, गुरुद्वारा, ढाबा येथे मुक्काम ठोकला. बऱ्याचवेळा मंदिरात भंडारा, लंगर जेवण घेतले. परतीचा प्रवास करताना गुजरातमधील , नातेवाईक, मित्र यांच्या घरी जेवण केले. या संपूर्ण यात्रेसाठी त्यांना साधारण २० ते २५ हजार रुपये खर्च आल्याचे दीपक शिर्के यांनी सांगितले.

नेहमीच कुठल्यातरी सायकलिंग मोहिमेवर असणाऱ्या तसेच हिमालयात अनेकवेळा गेलेल्या शिर्के यांनी ही यात्रा विशेष असल्याचे म्हटले आहे. सायकलिंग करताना विविध ठिकाणच्या वातावरणाचा नंद घेत प्रवास केल्याने तसेच जीवनातली महत्वाची यात्रा सायकलवर पूर्ण केल्याचे संपूर्ण समाधान यामुळे मिळत असल्याचे शिर्के म्हणाले.

सायकलिंग खेळ प्रसिद्ध नव्हता तेव्हापासून सायकलिंग करत असलेल्या शिर्के यांनी या आधीही एकूण १००० किमी अंतराची अष्टविनायक फेरी, विविध शक्तिपीठे, एवढेच नव्हे तर ११ दिवसात सर्व १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शनही त्यांनी सायकलवर प्रवास करत केले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सेवन सिस्टर्स म्हणजेच ईशान्य भारताची सात राज्ये सायकलवर फिरले आहेत. याबद्दल त्यांच्या टीम7 चे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्येही नाव नोंदवले गेले आहे.

महादेवाचे निस्सीम भक्त असलेले दीपक शिर्के यानंतर दक्षिण दिग्विजय मोहिमेला जाणार असून नाशिक ते रामेश्वरम अशी ही मोहीम असणार आहे.

LEAVE A REPLY

*