Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

कोरोना : पुण्यात पाच ठिकाणी कर्फ्यू

Share

 सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी मध्यरात्री पुण्यातील सर्व पेठा आणि शहराचा पूर्व भाग सील करण्यात आला होता. मंगळवारी पोलीस प्रशासनाने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील पाच ठिकाणी कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी सात वाजल्यापासून 14 एप्रिलपर्यंत हा कर्फ्यू राहणार आहे.

पुणे शहरातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन भाग, मंगळवार पेठ, रविवार पेठ, गाडीतल, खडकमाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत, स्वारगेट परिसर आणि कोंढवा परिसरात कर्फ्यू जरी करण्यात आला आहे.
पुणे शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने युद्ध पातळीवर कडक उपाययोजना सुरु केल्या आहेत. ज्या परिसरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मिळून आले आहेत. तो परिसर पूर्ण सील करण्यात आला असून, त्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मध्यरात्रीपासून पोलिसांनी कर्फ्यू लागू केला आहे. सर्वांना घरात थांबण्याचे सक्त आदेश दिले आहेत.

कर्फ्यू लागू करण्यात आलेल्या भागातील जीवनाश्यक वस्तू व सेवा याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत. या भागातील कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीने रस्त्यावर, गल्लोगल्ली या ठिकाणी संचार, वाहतूक करणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे या सर्व कृत्याला सक्त मनाई करण्यात आली आहे.
या आदेशातून पोलिस, आरोग्य विभाग, दवाखाना, औषधालये, अत्यवस्थ रुग्णांची वाहतूक, कोरोना प्रतिबंधक उपाय योजना संबंधित मनपा व शासकीय सेवा देणारे अधिकारी कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. याव्यतिरिक्त पोलिसांनी परवानगी दिलेल्या व्यक्तींना लागू नसतील. मात्र, त्यासाठी त्यांचे अधिकृत ओळखपत्र,आवश्यक कागदपत्रे व या विशेष कार्यासाठी नेमणुकीबाबतचे आदेश सोबत बाळगणे बंधनकारक असेल.

अंमलबजावणीबाबत आढावा
कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव पाहता पुणे शहरातील काही भाग प्रशासनाने सील करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बैठकीत अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यात आला.
बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम्, पुणे महानगर पालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांची उपस्थिती होती.
शहराच्या मध्यवर्ती भागात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कोंढवा तसेच महर्षीनगर ते आर. टी. ओ. कार्यालयापर्यंतचा जुन्या पेठांचा भाग काल मध्यरात्रीपासून सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भागात संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी होत आहे. सील केलेल्या भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आधिक आहे. त्यामुळे परिसरातील अन्य नागरिकांनाही संसर्ग होण्याच्या शक्यतेने प्रशासन याबाबत अधिक सक्रिय झाले आहे. सील केलेल्या भागातील नागरिकांनी संचारबंदीचे आदेश पाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. या सील केलेल्या भागातील दूध, भाजीपाला, गॅस, औषधे आदिंचा पुरवठा सुरु राहील. परिसरातील स्वच्छता गृहे, गल्लीबोळ निर्जंतुकीकरण करण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे. डॉक्टर, अत्यावस्थ रुग्ण, अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना यातून सूट मिळेल.
परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे, संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी स्वयंसेवी संस्था पोलीस विभागातर्फे समुपदेशन करुन प्रशासन आपल्या पाठीशी असल्याची भावना लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे,अशा स्वरुपाच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!