रावेर येथील सांस्कृतिक कलामंच बंद होणार

अखेरचा कार्यक्रम 20 जानेवारीला

रावेर।प्रतिनिधी- 

गेल्या तब्बल 21 वर्षांपासून शहर आणि परिसरातील रसिक श्रोत्यांचे ना नफा ना तोटा या तत्त्वावर मनोरंजन करणारी सांस्कृतिक कलामंच ही चळवळ थांबविण्याचा निर्णय मंचच्या कार्यकारिणीने घेतला आहे.मंचच्या या निर्णयाबाबत रसिक श्रोत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

शहर आणि परिसरातील रसिक श्रोते आणि प्रेक्षकांसाठी डॉ राजेंद्र आठवले,हेमेंद्र नगरिया,एस के महाजन (खिर्डी ) आणि दिलीप वैद्य यांच्या संकल्पनेतून 21 वर्षांपूर्वी या मंचचा जन्म झाला.रसिक श्रोत्यांनी आपल्याच स्वनिधीतून मना नफा ना तोटाफ या तत्त्वावर नाटक, संगीत मैफल, एकपात्री अशा कार्यक्रमांचे आयोजन करून कुटुंबासह त्याचा आस्वाद घ्यावा असे या मंचचे स्वरुप होते.

व पु काळे यांच्या कथाकथनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.गेल्या 21 वर्षात मंचने रसिक श्रोत्यांची सांस्कृतिक भूक भागवली.शहर आणि परिसरातील रसिकांना कुटुंबासह जाण्याचे हे एकमेव ठिकाण होते.

या 21 वर्षात मंचने प्राचार्य राम शेवाळकर,शिवाजीराव भोसले,द मा मिरासदार,राजीव दीक्षित यांची व्याख्याने आणि कथाकथन यांचे कार्यक्रम केले.दिलीप प्रभावळकर,प्रभाकर पणशीकर, लक्ष्मीकांत बेर्डे,भरत जाधव, निर्मिती सावंत,गिरीश ओक, मकरंद अनासपुरे यांच्यासह कसलेल्या नाट्य कलावंतांचा अभिनय रसिकांना बघायला मिळाला.

नटसम्राट,तो मी नव्हेच, इथे ओशाळला मृत्यू,श्रीमंत दामोदर पंत,जाऊबाई जोरात, संगीत मानापमान असे नाट्यप्रयोग येथे रसिकांना बघायला मिळाले. या 21 वर्षात दरवर्षी तीन याप्रमाणे 63 कार्यक्रमांचे आयोजन या मंचने केले.

मात्र सध्या दूरदर्शनवर,मोबाईल आणि संगणकावर मनोरंजनाची विपूल साधने उपलब्ध झाल्यामुळे चळवळ थांबवण्याचा निर्णय कार्यकारिणीच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला.

अखेरचा कार्यक्रम 20 जानेवारीला

सांस्कृतिक कला मंचचा शेवटचा कार्यक्रम ख्यातनाम गायक आणि सारेगमपचा विजेते मंगेश बोरगावकर यांच्या भक्तिरंग या भक्तीगीतांच्या मैफलीने होणार आहे.कलामंचचे सदस्य आणि निमंत्रित श्रोत्यांसाठी सायंकाळी साडे सहा वाजता सरदार जी जी हायस्कूल मध्ये हा कार्यक्रम आयोजित होणार असल्याचे अध्यक्ष पुष्कराज मिसर आणि सचिव अशोक पाटील यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाच्या बदलत्या युगात मोबाईल,संगणक आणि युट्युबवर सर्व प्रकारचे मनोरंजक कार्यक्रम सहजपणे उपलब्ध होत असल्याने ही चळवळ बंद करण्याचा निर्णय घेत आहोत. शहर आणि परिसरातील अन्य इच्छुक व्यक्ती किंवा संस्थांनी पुढाकार घेतल्यास त्यास शक्य तेवढी मदत करु

 दिलीप वैद्य, संस्थापक सदस्य, सांस्कृतिक कलामंच, रावेर