Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

विद्यापीठाच्या महाविद्यालयात पीकशास्त्र विषय बंद करण्याचे षडयंत्र

Share

राहुरी (प्रतिनिधी) – राज्याला शेतीचे ज्ञान देऊन शेतकर्‍यांना पीक लागवडीचे धडे देणार्‍या येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात पीकशास्त्र हा विषय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाल्याची माहिती पालकांनी दिली आहे.

दरम्यान, या महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिकाच पालकांना पीकशास्त्र विषय घेण्यापासून विरोध करीत असून याबाबत त्यांच्याशी पालकांनी वाद घालण्याच्या घटना घडल्या आहेत. तर या विषयाला माझा विरोध नसून संबंधित वरिष्ठ मंडळच पीकशास्त्र बंद करणार असल्याची स्पष्टोक्ती संबंधित मुख्याध्यापिकेने दिली आहे.

पीकशास्त्र विषय बंद करू नये, अशी तक्रार गटशिक्षणाधिकार्‍यांकडे करण्यात आली असून त्यावर गटशिक्षणाधिकारी काय भूमिका घेतात? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
सन 2001-2002 साली महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कनिष्ठ महाविद्यालयात पीकशास्त्र हा 200 गुणांचा विषय उपसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण यांच्या अखत्यारीत सुरू करण्यात आला होता. यात 120 गुणांचे प्रात्यक्षिक आणि थेअरीसाठी 80 गुणांचा अंतर्भाव आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे शेतीशी निगडीत असल्याने येथे पीकशास्त्र या विषयाला अधिक वाव आहे. यावर्षी विद्यार्थ्यांचे 106 प्रवेश अर्ज प्राप्त झाले होते.

त्यात 60 विद्यार्थी प्लेन सायन्स आणि 20 विद्यार्थी पीकशास्त्र (क्रॉपसायन्स) असे नियमानुसार प्रवेश देणे बंधनकारक आहे. दि. 25 जुलैपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रवेश प्रक्रिया संपलेली नसताना देखील प्लेन सायन्सला 69 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. तर पीकशास्त्राच्या जागा शिल्लक असतानादेखील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्यावर मुख्याध्यापिकेने 80 जागा भरल्याचे कारण सांगून पालकांची बोळवण केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

पीकशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्यादृष्टीने योग्य नसून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची माहिती मुख्याध्यापिकाच देत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. प्रवेश घ्यायचा असेल तर प्लेन सायन्सलाच घ्या, असा दबाव पालकांवर टाकण्यात येत असल्याची चर्चा पालकांमध्ये सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांना गणित विषय अवघड वाटतो, ज्यांना सीईटी, नीट व बी ग्रुपची तयारी करायची असेल त्या विद्यार्थ्यांना पीकशास्त्र विषय फायदेशीर असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. मागील शैक्षणिक वर्षात या महाविद्यालयातील तीन विद्यार्थी पुणे बोर्डात 200 पैकी 200 गुण मिळवून प्रथम आले होते. मात्र, यंदा पीकशास्त्र विषय बंद होणार असल्याचे सांगण्यात आल्याने विद्यार्थी व पालक संतप्त झाले आहेत.

ज्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शेतीची आवड आहे, ज्यांना गणित विषय सोडून बी ग्रुपची निवड करायची असेल त्यांना पीकशास्त्र विषय बंद झाल्याने अशा शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठात शेतीशी निगडीत असलेला पीकशास्त्र विषय बंद करण्याचे षडयंत्र सुरू झाल्याने अशा झारीतील शुक्राचार्यांची चौकशी करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

पीकशास्त्र हा विषय ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या मुलांसाठी शेतीविषयक ज्ञान घेण्याचा एक उत्तम पर्याय आहे. पीकशास्त्र विषयामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणामध्ये अनेक नव्या संधी उपलब्ध होतील. राज्य शासन शाळेत शेती विषयाचा समावेश करण्याचा विचार करीत असून महात्मा फुले विद्यापीठातील कनिष्ठ महाविद्यालयात मात्र, पीकशास्त्र विषय बंद करणे ही निंदनीय बाब आहे. त्यामुळे हा विषय बंद होऊ नये, व तसा प्रयत्न झाल्यास कृषी पदवीधर संघटनेकडून या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. वेळप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रशासनाशी संघर्ष करण्याची आमची तयारी आहे.
– महेश कडूस,
प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर संघटना.

शेतकर्‍यांच्या मुलांना शिक्षण आर्थिक बाबींमुळे दुरापास्त झालेले असताना राहुरी विद्यापीठात शेतीशी निगडीत असलेला पीकशास्त्र विषय बंद करण्याचा निर्णय ही विद्यापीठाच्यादृष्टीने मोठी लांछनास्पद गोष्ट आहे. पीकशास्त्र विषय बंद केला तर महाविद्यालयाच्या प्रांगणात पालकांसह आंदोलन करू. हा विषय बंद होऊ देणार नाही. या महाविद्यालयातील काही शिक्षक आणि मुख्याध्यापक पालकांची या विषयाबाबत दिशाभूल करीत असून वरिष्ठांचे नाव सांगून हा विषय बंद करण्याच्या मनःस्थितीत आहेत. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही.
– सतीश सौदागर,
प्रांत संघटक, राष्ट्रीय छावा संघटना. 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!