दहा हजारांच्या कर्जाचे निकष अन्यायकारक

शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचा आरोप

1
नाशिक | शेतकरी प्रश्नांवर सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्ज माफीपूर्वी थकीत कर्जदारांना खरीप निविष्ठांसाठी दहा हजार रुपये तातडीचे पिककर्ज देण्या संदर्भात शासनाने आदेश काढला आहे.

आदेशामध्ये असे कर्ज मिळविण्यासाठी अनेक अटी लादण्यात आल्या आहेत. सदरच्या अटींमुळे बहुतांश गरजू व संकटग्रस्त शेतकरी या कर्ज मदतीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे दहा हजारांच्या कर्जाचे निकष अन्यायकारक असल्याचे सुकाणू समितीने एका निवेदनाद्वारे म्हटले आहे. समितीचे डॉ अजित नवले यांनी हे निवेदन प्रसिद्धीसाठी दिले आहे.

या निवेदनात खालीप्रमाणे बाबी नमूद केल्या आहेत.

शासनाने आदेशात अशा कर्जासाठी ३० जून २०१६ रोजी थकीत असलेल्यांनाच पात्र ठरविले आहे. प्रत्यक्षात ३१ मार्च २०१७ रोजी पर्यंत जे शेतकरी कर्जफेड करू शकलेले नाहीत व त्यामुळे नवे पिककर्ज घेऊ शकलेले नाहीत त्या सर्वांनाच अशा तातडीच्या कर्जाची नितांत आवश्यकता आहे. सरकार मात्र वस्तुस्थितीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे.

तातडीच्या कर्जमाफीसाठी कोणास अपात्र करावे या विषयी शासनादेशामध्ये मोठी यादी दिली आहे. आदेशात दिलेल्या यादीप्रमाणे या सर्वांना कर्जासाठी अपात्र केल्यास एकूण शेतक-यांपैकी खूपच थोडे शेतकरी कर्ज मिळण्यासाठी पात्र ठरणार आहेत.

अपात्रतेचे हे निकष शेती व ग्रामीण वास्तवाशी सरकारी पक्षाची नाळ तुटलेली असल्याचेच लक्षण असल्याचेही सुकाणू समितीकडून म्हटले जात आहे.

आदेशानुसार शासकीय नोकरीत किंवा अनुदानित संस्थेत नोकरीस असणारांना अशा कर्जासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. ग्रामीण भागात अजूनही खाते फुटले नसल्याने अनेक भावांची नावे एकाच उता-यावर व रेशन कार्डवर एकत्रच असतात. मात्र त्यांचे व्यवहार वेगवेगळे असतात. ब-याचदा जमीन वहिवाटही  वेगवेगळा असतो मात्र उतारा संयुक्त असतो. अशा परिस्थितीत त्यापैकी एखादा नोकरीत असेल तर  उता-यावरील सर्वच भावांना अशा कर्जापासून वंचित राहावे लागणार आहे. अनेक गरजू व संकटग्रस्त  शेतक-यांवर यामुळे अन्याय होणार आहे.

ग्रामीण भागात अनेक गरीब शेतक-यांनी जमिनी विकून किंवा गहाण टाकून मुलाबाळांची शिक्षणे केली आहेत. संस्थांमध्ये नोक-या मिळाव्यात यासाठी लाखोंची कर्ज अंगावर घेत देणग्या दिल्या आहेत. अनेकांचा हा बोजा अद्याप फिटलेला आही. असे शेतकरी अद्यापही अत्यंत अडचणीत आहेत. असे असताना सरसकट नोकरी असणारांना कर्ज नाकारणे अन्यायकारक आहे.

आदेशामध्ये विविध निवडणुकांमध्ये निवडून आलेल्यांना कर्जासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. जे निवडून आले आहेत व सक्षम आहेत त्यांना अशी मदत नाकारण्यास कुणाचाच विरोध असण्याचे कारण नाही. परंतु सरसकट सर्वच निवडून आलेले सक्षम आहेत असे मानून वर्तन करणे कितपत योग्य आहे.

अगदी जिल्हा परिषद, पंचायत समिती, सहकारी दुध संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, साखर कारखाना, सुत गिरणी, नागरी बँका यामध्ये निवडून गेलेले सारेच सरसकट सक्षम आहेत असे सरकारचे आकलन आहे. त्या सर्वांना कर्जासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

लोकशाही निवडणुकांबाबत आपले आकलन काय आहे याचे अत्यंत दिवाळखोर प्रदर्शन या अटीतून सरकारने केले आहे. पैसे असणारेच निवडून जिंकू शकतात हेच अधिकृतरीत्या मान्य करण्याचा हा प्रकार आहे. ज्या अर्थी तो निवडून आला त्या अर्थी तो श्रीमंतच असला पाहिजे असा सरळ अर्थ शासनाने ‘अधिकृतरीत्या’ काढला असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.

दलित, आदिवासींसह आपण अनेक प्रवर्गांसाठी निवडणुकीत राखीव जागा ठेवल्या आहेत. अशा प्रवर्गातून आलेले व दुध संघासारख्या निवडणुकांमधून निवडून आलेले सारेच श्रीमंत किंवा सक्षम आहेत, ते संकटग्रस्त नाहीत असे सरकारचे सरसकट आकलन दिसते आहे. सरकारचे हे आकलन दुरुस्त करण्याची गरज आहे.

कुटुंबातील कोणा एकाच्या नावे जरी चार चाकी वाहन असेत तरी अशा कुटुंबाला कर्जासाठी  अपात्र ठरविण्यात आले आहे. ग्रामीण भागात शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी शेतकरी अत्यंत जीर्ण वाहने अत्यल्प कींमतीत विकत घेत असतात. अशा शेतक-यांनाही या अटीमुळे वंचित राहावे लागणार आहे.

कुटुंबाची शेती एकत्र आहे, रेशन कार्ड सुद्धा एकत्रच आहे मात्र व्यवहार वेगळे वेगळे आहेत अशीच कुटुंब व्यवस्था आज ग्रामीण भागात प्रचलित आहेत. अशा परिस्थितीत घरातील अशा विभक्त व्यवहार असणा-या चार चाकी वाहन धारकांमुळे इतर सर्वांनाच कर्जासाठी अपात्र ठरविणे अत्यंत अन्यायकारक आहे.

राज्यात सध्या कर्जमाफीचे निकष ठरविण्याची प्रक्रिया सुरु आहे. शेतकरी संप व  आंदोलनाचा परिणाम म्हणून निकष समिती बनविण्यात आली आहे. निकष समितीमध्ये शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व शासनाचे प्रातिनिधी असणार आहेत. निकष अद्याप ठरलेले नाहीत. असे असताना तातडीचे कर्ज मिळविण्यासाठी शासनाने आदेश काढून वरील निकष जाहीर केले आहेत. सदरचे कर्ज मिळविण्यासाठीचे हेच निकष येत्या काळात कर्जमाफीचे निकष म्हणून रेटण्याचा शासनाचा प्रयत्न असणार आहे.

असे झाल्यास राज्यातील बहुतांश शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहणार आहेत.  शेतकरी आपल्या वरील  हा अन्याय बिलकुल खपवून घेणार नाहीत.

बड्या कॉर्पोरेट कंपन्या, श्रीमंत लोकप्रतिनिधी, मोठे प्रक्रियादार, कारखानदारांना शेतक-यांसाठीच्या सोयी सवलतींचा, अनुदानांचा व कर्जमाफीचा गैरफायदा घेता येऊ नये यासाठी निकष हवेत असे सरकार सांगत होते. सरकारच्या या भूमिकेचे सुकाणू समितीनेही स्वागतच केले होते. मात्र या निकषांच्या आडून सरकार गरजू व संकटग्रस्त शेतक-यांना वंचित ठेवणार असेल तर ही अत्यंत अन्यायकारक बाब आहे.

सरकारने या सर्वाची दखल घेत तातडीच्या पिक कर्जासाठी काढलेला शासनादेश तातडीने दुरुस्त करावा. सर्व संकटग्रस्त व गरजू शेतक-यांना कर्जमाफी व नव्या हंगामासाठी पुरेसे कर्ज द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनांची सुकाणू समिती करीत आहे.

1 COMMENT

 1. विषय -: शासनाने जाहीर केलेल्या कर्जा संबंधीच्या निकषां बद्दल ….

  अ )अल्पभूधारकांसाठी सरसकट कर्जमाफी
  मुद्दा –

  १ )अल्पभूधारकांमध्ये सरकारी नोकरदार आहे की नाही याचा विचार व्हावा .
  २ )अल्पभूधारकांमध्ये सदस्याच्या नावे चारचाकी वाहन आहे की नाही याचा विचार व्हावा.
  ३ )अल्पभूधारकांमध्ये सदस्याचे उत्पन्नाचे दुसरे साधन आहे की नाही याचा विचार व्हावा.

  ब ) बहुभूधारकांसाठी कर्जमाफीचे निकष

  मुद्दा –
  १) घरबांधणीसाठी घेतलेल्या कर्जाची अट व व्यावसायिक वाहनासाठी घेतलेले कर्ज हा वगळण्यात यावा हि अपेक्षा.
  कारण शेतकऱ्याने शेतीमालाला योग्य भाव मिळेल व त्यातून आपण हे घेतलेले कर्ज फेडू या हेतूनेच
  कर्ज काढून शेतीच्याच कामासाठी ट्रॅक्टर घेतला असेल,आपल्या डोक्यावर छत असावं म्हणून घर बांधलं असेल. पण आज त्याच्या शेतमालाला योग्य भाव नाही त्यामुळे तो नाडला गेला आहे,आज जो उत्पादन खर्च अल्पभूधारकाच्या मालाला लागतोय,अन आणि जी किंमत अल्पभूधारकाच्या मालाला मिळते तीच किंमत बहुभूधारकाच्या मालाला मिळतेय , त्यासाठी काही वेगळा भाव सरकारने ठरून दिलेला नाही.त्यामुळे हे दोन मुद्दे वगळण्यासाठी आपण प्रयत्न करावा हि विनंती
  २) अल्पभूधारकाच्या जमिनीचे निकष बदलून ५ एकर ऐवजी ८ एकरापर्यँत वाढवता येतील का ? तशी तरतूद करता येईल का याचा विचार देखील व्हावा . कारण बरेचशे शेतकरी हे ७-८ एकरापेक्षा कमी जमीन असणारे आहेत .. जेणे करून जास्तीत जास्त शेतकरी वर्ग लाभार्थी यादीत येऊ शकेल.

LEAVE A REPLY

*