Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व अभाविपचे कार्यकर्ते भिडले; ‘श्रेय’ घेण्यावरून उफाळला वाद

Share

नाशिक । प्रतिनिधी

पुणे विद्यापीठातील वाणिज्य (कॉमर्स) शाखेच्या तिसर्‍या वर्षात शिक्षण घेत असलेले नाशिकमधील शेकडो विद्यार्थी बिझनेस रेग्युरेटरी फेमवर्क अर्थात ‘एम-लॉ’ विषयात अनुत्तीर्ण झाल्याचे रिझल्ट दाखविण्यात आले आहे. या विषयाचे 3 दिवसांत पुनर्मूल्यांकन करावे, यांसह मागण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नाशिक शाखेने मंगळवारी (दि. 18) जुन्या पोलिस आयुक्तालयाजवळील पुणे विद्यापीठ उपकेंद्रात आंदोलन केले.

याचवेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे कार्यकर्ते येथे आले व या विषयाचे अभाविप श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. त्यातून दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी आमने-सामने आल्याने जोरदार घोषणाबाजी करीत भिडले. मात्र, उपस्थित पोलिसांनी समयसुचकता दाखवित हस्तक्षेप करून दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

वाणिज्य शाखेतील तिसर्‍या वर्षातील एका विषयाच्या निकालासंदर्भात व अन्य तक्रारींबाबत अभाविपने विद्यापीठाच्या विभागीय उपकेंद्रात आंदोलन आले. आंदोलन सुरू असतानाच राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी तेथे आले व त्यांनी अभाविपविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली.

राज्याचे उच्च शिक्षणमंत्री अभाविपतूनच आलेले असून, संघटनेने केवळ आंदोलन न करता याप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना जाब विचारला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने केली.

यापूर्वी देखील राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने आंदोलने करून विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या सोडविल्या आहेत; मात्र, अभाविपने त्याचे श्रेय लाटल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला.

उपकेंद्र विभागीय समन्वयकांच्या केबिनमध्येच आरोप-प्रत्यारोप आणि घोषणाबाजी झाल्याने पोलिसांनी दोन्ही संघटनांच्या पदाधिकार्‍यांना बाहेर काढले. बाहेर आल्यानंतरही घोषणाबाजी सुरूच असल्याने पोलिसांनी अखेर दोन्ही संघटनांच्या पदाधिकार्‍यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस ठाण्यात नेऊन समज दिल्यावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!