अपंग समावेश शिक्षणासाठी अडीच कोटींचा निधी

0

1 लाख 922 विद्यार्थ्यांना होणार फायदा

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात केंद्र पुरस्कृत सर्वशिक्षा अभियानातून अपंग समावेश शिक्षण योजना राबण्यात येते. या योजनेत यंदा केंद्र सरकारने 2 कोटी 51 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून 1 लाख 922 अपंग विद्यार्थ्यांना विविध लाभ देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
सर्वशिक्षा अभियानात जिल्ह्यात अपंग समावेश शिक्षण योजनेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन यात विविध आजाराने, विकाराने पीडित असणार्‍यांवर उपचार करण्यात येते. मंददृष्टी, अंध, कर्णदोष, वाचादोष, अस्थिव्यंग, मतिमंद, बहू विकलांग, सेरेब्रल पाल्सी, अध्ययन अक्षम, ऑटिझम या विकारावर या योजनेत उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात येऊन विद्यार्थ्यांना आवश्यक त्या साहित्याचा पुरवठा करण्यात येतो.
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या अडीच कोटी रुपयांत तालुकानिहाय आरोग्य शिबिरे घेण्यासाठी 2 लाख 80 हजार, शस्त्रक्रियांसाठी 1 लाख, साहित्य साधने खरेदीसाठी 13 लाख 75 हजार, साहित्य दुरूस्तीसाठी 40 हजार, मदतनीस भत्त्यापोटी 23 लाख 75 हजार, प्रवास भत्त्यासाठी 7 लाख 50 हजार, शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी 7 लाख, पालक प्रशिक्षणासाठी 91 हजार, विशेष शिक्षकांच्या वेतनासाठी 1 कोटी 93 लाख आणि भौतिक उपचारासाठी 80 हजार रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

तालुकानिहाय अपंग विद्यार्थी –
अकोले 889, संगमनेर 1 हजार 331, कोपरगाव 615, राहाता 888, राहुरी 1 हजार 65, श्रीरामपूर 679, नेवासा 454, शेवगाव 672, पाथर्डी 792, जामखेड 669, कर्जत 688, श्रीगोंदा 506, पारनेर 911 आणि नगर 763 असे आहेत.

LEAVE A REPLY

*