भूमिअभिलेख कार्यालयात महिलेने अंगावर रॉकेल ओतून घेतले

0

अधिकार्‍याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – जमिनीची मोजणी का करत नाहीत या कारणावरून श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील एका महिलेने श्रीगोंदा येथील भूमिअभिलेख कार्यालयात जाऊन तेथे स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे भूमिअभिलेख कार्यालयातील सहायक उपअधीक्षक विजय आत्माराम राठोड यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात या महिलेविरोधात फिर्याद दिली असून त्याच्या फिर्यादीवरून या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील सुनीता बापूराव पालकर या 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा येथील भूमिअभिलेख कार्यालयात गेल्या व त्यांनी सहायक उपअधीक्षक राठोड यांना श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील गट नंबर 208,224 ची मोजणी का झाली नाही असे विचारले असता राठोड यांनी पालकर यांना मी माझे मोजणीदार कर्मचारी आल्यावर त्यांच्याकडे चौकशी करून सांगतो असे सांगितले.

त्यानंतर राठोड हे आपल्या कामाला लागले त्यावर त्यांना रॉकेलचा वास आला म्हणून त्यांनी पाहिले असता ती महिला भिजल्याचे दिसले व खालीही रॉकेल पडल्याचे दिसले. त्यावर राठोड यांनी त्यांच्या बाकीच्या कर्मचार्‍यांना बोलावले तोपर्यंत ही महिला सरकारी दवाखान्यात गेल्याचे समजले त्यावर राठोड यांनी झाल्याप्रकाराबाबत 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता श्रीगोंदा पोलिसांना पत्र दिले होते.

आज दि 5 डिसेंबर रोजी श्रीगोंदा भूमिअभिलेख मधील सहायक उपअधीक्षक विजय आत्माराम राठोड यांनी श्रीगोंदा पो ठाण्यात सुनीता बापूराव पालकर रा. काष्टी या महिलेने तिचे जमिनीची कायदेशीर प्रक्रियेत अडथळा आल्याने मोजणी करता आली नाही म्हणून त्या महिलेने भूमिअभिलेख कार्यालयात कार्यालय प्रमुख यांच्या दालनासमोर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

 

LEAVE A REPLY

*