लोणी अत्याचार घटनेतील मुलीच्या प्रकृतीत सुधारणा

0

एकलव्य आदिवासी संघटना आश्वी पोलिसांना विचारणार जाब

लोणी (वार्ताहर) – लोणीच्या अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचारा नंतर तिची प्रकृती खालावली होती. गरिबीमुळे ती दवाखान्यात उपचार घेऊ शकली नाही. मात्र लोणीतील ग्रामस्थांनी पुढे येऊन तिला प्रवरा रुग्णालयात दाखल केले आणि रुग्णालयानेही सकारात्मक प्रतिसाद देत तिच्यावर मोफत उपचार सुरु केले आहेत. तिची प्रकृती हळुवारपणे सुधारत असून एकलव्य आदिवासी संघटनांनी तिची विचारपूस केली असून उद्या कारवाईत दिरंगाई केल्याप्रकरणी आश्वी पोलिसांना या संघटना जाब विचारणार आहेत.

लोणीतील अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून तिच्यावर बारा दिवस अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दैनिक सार्वमतने समोर आणल्यानंतर एकच खळबळ उडाली. मुलीला गरिबीआभावी वैद्यकीय उपचार मिळत नसल्याने ती घरीच मृत्यूशी झुंज देत होती. लोणी बुद्रुक ग्रामस्थांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर निवडक ग्रामस्थ अत्याचारित मुलीच्या घरी गेले. त्यांनी तिला व आईवडिलांना धीर दिला. शिवाय तातडीने लोणीच्या प्रवरा रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली.

अतिशय नाजूक परिस्थितीत तिच्यावर उपचार सरू झाले. प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र विखे पाटील यांची भेट ग्रामस्थांनी घेतल्यानंतर मुलींवरील सर्व उपचार मोफत सुरू झाले.काल तिला दोन बाटल्या रक्तही देण्यात आले. आता ती शुद्धीवर आली असून प्रकृती सुधारत आहे. दरम्यान एकलव्य आदिवासी महासंघ आणि आदिवासी संघटनांनी मुलीच्या प्रकृतीची विचारपूस केली.

तिच्या पालकांना भेटून या कार्यकर्त्यांनी धीर देऊन मुलीला न्याय मिळेल असा विश्वास दिला.आज आदिवासी संघटनांचे नेते आश्वी पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेतील आरोपी एवढे दिवस मोकळे कसे राहिले याचा जाब पोलिसांना विचारणार आहेत. रेवणनाथ जाधव, ज्ञानेश्वर अहिरे हे पोलिसांना भेटणार आहेत.

हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणार्‍या अधिकारी,कर्मचार्‍यांवर तात्काळ कारवाई करावी म्हणून जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटून मागणी करणार आहेत. पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी सर्व आरोपीना तात्काळ अटक करावी अशी मागणीही आदिवासी संघटनांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*