Type to search

Featured सार्वमत

वाळू-मटक्याचा तोफखाना !

Share

उचापती- संदीप रोडे

एसपींच्या कार्यपध्दतीची प्रवाही दिशा पाहून त्यासोबत चालणारे अनेक पोलीस कर्मचारी-अधिकारी जिल्हा पोलीस दलात कार्यरत आहेत. नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यातील बहुतांश कर्मचारी मात्र त्याला अपवाद असल्याचे अनेकदा सिध्द झालयं. प्रवाहाच्या उलट दिशेने जाण्याची अर्थात ‘कलेक्शन’ सांभाळण्याची हिंम्मत केल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात दोन महिन्यात तिसरा पोलीस सस्पेंड झाला. ‘कमाई’ची चैन असल्याचे बोलले जात असले तरी या चैनेतील पहिली कडी नेहमीच समोर येते. अन्य कड्याभोवती फक्त चर्चा घुटमळते. तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलिसांना वाळू, मटका कलेक्शनचा तोफगोळा भवला अन् एकामागे एक तिघे सस्पेंड झाले. एसपी चेंबरपासून काही मीटर अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्याची ‘मोहमाया’ पाहता दंडुक्याची भाषा सोडून ‘काय-द्याची’ चलती सुरू असल्याचे म्हटल्यास अतिशोक्ती ठरू नये. 

ईशू सिंधू नावाच्या एसपींनी जिल्हा पोलीस दलाचे बॉस म्हणून नगरात पाऊल ठेवताच ‘दोन नंबर’ धंद्यावाल्यांना ‘क्लोज’चे निरोप धाडले गेले. पूर्वीच्या एसपी कार्यकाळातील ‘चलती’ बंद झाल्याने अनेक पोलीस अस्वस्थ असल्याचे दिसून आले. त्या अस्वस्थतेतूनच त्यांची चुळबुळ सुरू झाली. मात्र या चुलबुळपाड्यांना एसपी सिंधू यांच्या कार्यपध्दतीचा झटका काहींना डायरेक्ट-इनडायरेक्ट बसला हे वास्तव. मात्र त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. एसपी सिंधू कितीही कठोर, शिस्तप्रिय असले तरी कर्मचारी मात्र निर्ढावले असल्याचा प्रत्यय वांरवार येऊ पाहतोय. ‘काय-द्याचे’ बोल पोलीस दलात घुमत असले तरी त्यातील प्रत्येक शब्द एसपींच्या कानावर जातोच असे नाही.

अनेक प्रकरणात तडजोडी सुरू असून झाकली मूठ.. म्हणीनुसार सारं काही अलबेल असल्याचा आव आणला जातोय. पण त्यातील काही मिडियामुळे समोर येतात अन् मग इनक्वॉयरी करून कारवाईचा डंका पिटतो. ’खास दूता’ करवी एसपी सिंधू यांनी जिल्हा पोलीस दलाची जंत्री जमविली तर किमान डझनभर अधिकारी अन् कित्येक पोलीस ‘रेड रिमार्क’ला पात्र ठरतील.

तोफखाना पोलीस ठाण्यातील बाळकृष्ण दौंड नावाचा पोलीस कालच सस्पेंड झालाय. मटक्यावाल्यासोबत तो घेण्या-देण्याच्या गप्पागोष्टी करत होता. त्यापूर्वी नंदू सांगळे नावाचा याच ठाण्यातील पोलीस वाळूवाल्याच्या नादापायी निलंबीत झाला. त्यापूर्वीही दीपक रोहोकले नावाचा तोफखान्यातील ‘कलेक्टर’ सस्पेंड झाला. या ‘कलेक्टराची’ फाईल तर कित्येक दिवस खांदेपालटात एसपी कार्यालयात पडून होती. पण एसपी सिंधू यांच्या हाती ती लागताच झटका तोफखान्याला शॉक बसला.
अवैध धंद्यावाल्यांशी हातमिळवणी केल्याचा दोन महिन्यात तिसरा सस्पेंडचा बळी तोफखाना पोलीस ठाण्यात गेला. त्यापूर्वी गांजा प्रकरणात पीआयसह डझनभर पोलीस सस्पेंड झाल्याचा इतिहास आहेच. त्यातील अनेक जण आता नाक वर करून ‘खाकी’त फिरताहेत, त्यांच्या जंत्रीवर एसपींनी एकदा नजर मारली तरी पुरे!
तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत अनेक धंदे आजही सुरू असून तेथीलच काही महाभाग ‘उद्योग’ करत असल्याची चर्चा आजही आहे.

सीआर हजारापुढं
तोफखाना पोलीस ठाण्याचा सीआर हजाराच्या पुढं गेला आहे. सहा महिन्यातच गुन्ह्यांचा उच्चांक तोफखान्याने गाठला. अर्थात फर्स्ट,सेंकड आणि थर्डचे वर्गीकरण केले तर त्यात लवचिकता येईल. पोलीस बळ कमी असल्याचे नेहमीचे उत्तर दिले जाईल, पण म्हणून काय ‘धंद्यांना’ प्रोत्साहन द्यायचे का? याचाही विचार कुठंतरी झाला पाहिजे. कोपरगावात भररस्त्यात महिलावर काल रात्रीच झालेला गोळीबार.. श्रीरामपुरात एसीबीची फेल गेलेली रेड या घटना पाहता जिल्हा पोलीस दलाचा दबदबा दिसून येतो.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!