सीडस् विक्रीचा काळा बाजार; नाशिक पोलिसांकडून नायजेरीयन ताब्यात

0
नाशिक ।  फेसबुकवर मैत्री करून ऑनलाईन औषधीयुक्त महागड्या बिया खरेदी-विक्रीच्या नावाखाली व्यवहारात अडकवून लाखो रुपयांची लूट करणार्‍यांचा नाशिकच्या पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणी एका नायजेरीयन युवकास अटक करण्यात आली आहे.

नील्स हॅम्पे (30, रा. नवी मुंबई, मूळ नायजेरीया) असे या या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. नवी मुंबई येथे सापळा रचून त्यास पकडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 जुलै रोजी पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात नाशिक शहरातील एका व्यावसायिकाने या प्रकरणी तक्रार दाखल केली होती.

सोशल मीडियावरून ओळख वाढवून एड्स आणि कर्करोगावरील औषधे खरेदी करण्याचे सांगून सदर व्यावसायिकास गंडवण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यांपासून नाशिक पोलीस त्याच्या शोधात होते.

संशयितांच्या टोळीतील तरुणी 40 ते 50 वर्षीय वयोगटातील व्यक्तींना हेरून त्यांच्यासोबत फेसबुकवरून मैत्री वाढवत असे. त्यानंतर नोकरी संकटात आल्याचे सांगत संशयित तरुणी नागरिकांकडे मदत मागत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका तक्रारदारास याचप्रमाणे जाळ्यात अडकवण्यात आले. संशयित तरुणीने तक्रारदाराशी फेसबुकवरून ओळख वाढवून अडचणीत असल्याचे भासवले.

आमची कंपनी 5 लाख पौंडाला संकेतस्थळावरून औषधे खरेदी करते. परंतु भारतातून यापूर्वी पुरवठा करणार्‍यांनी तो अचानक बंद केला आहे. यामुळे आपलीही नोकरी धोक्यात आहे. जर त्या औषधी बिया तुम्ही भारतातून आम्हाला पुरवल्या तर आपली नोकरी वाचेल तसेच तुम्हालाही चांगला फायदा होईल.

या बिया भारतात अवघ्या 50 हजार ते 1 लाख रुपयात मिळतात तर यासाठी आमची कंपनी 5 लाख रुपये मोजते, अशी माहिती देऊन ही औषधे खरेदी करून आमच्या कंपनीस पुरवण्याची गळ घातली गेली. त्यामुळे तक्रारदाराने तरुणीने सांगितलेल्या संकेतस्थळावर त्या बियांच्या नावाने शोध घेतला असता त्यांना माहिती मिळाली.

तसेच त्यांनी तातडीने एक किलो औषधी बियांची मागणी केली होती. नवी मुंबई येथे ही औषधे घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी पैसे देऊन औषधी बिया विकत घेतल्या. मात्र औषधांच्या नावाखाली त्या केवळ करंज या झाडाच्या साध्या बिया विकल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. तसेच ज्या संकेतस्थळी त्याची विक्री करायची होती ते सर्व बंद झाले होते.

यामुळे आपली फसवणूक झाल्याचे समजताच संबंधिताने सायबर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तपास करून मुंबई येथून एका नायजेरीयन संशयितास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे चौकशी सुरू असून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक देवराज बोरसे, जयश्री मूर्ती, किरण जाधव, मंगेश काकुळते, शेखर बडगुजर यांनी या तपासात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

*