श्रीगोंद्यातील अवैध वाळू उपसा : ठेकेदारासह 31 जणांवर गुन्हा

0

दोन कोटी 40 लाखाचा मुद्देमाल जप्त; चार जणांना अटक

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – तालुक्यातील राजापूर हद्दीत घोड नदी पात्रात घेतलेल्या वाळू लिलावात अटी व शर्तीचा भंग करुन वाळू उपसा होत असल्याने जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी स्वत: पुढाकार घेत 27 रोजी कारवाई केली होती. या कारवाईनंतर बेलवंडी पोलीस ठाण्यात ठेकेदारासह 31 वाहन चालक व मालकावर अवैध वाळू उपसा करणे व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये प्रशासनाने सुमारे दोन कोटी 40 लाखांचा मुद्देमाल जप्त करून चार जणांना अटक केली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथील घोड नदी पात्रातील 1 हजार 802 ब्रास वाळूचा लिलाव ज्ञानदेव अरुण शेलार यांनी 90 लाख 10 हजार रुपयांना घेतला होता. 17 डिसेंबर पासून या वाळूचा उपसा सुरु होता. मात्र या ठिकाणी प्रमाणापेक्षा अधिक वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थानी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या होत्या. या तक्रारीनंतर नव्याने हजर झालेले जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी दखल घेत 26 मे रोजी स्वतः पथकासह राजापूर येथील घोडनदी पात्रात छापा टाकला होता. या कारवाईमध्ये जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्यासह प्रांताधिकारी गोविंद दानेज, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, बेलवंडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, महसूल आणि पोलीस कर्मचारी असे साठ ते सत्तर जणांचे पथक सहभागी झाले होते.
घोडनदी पात्रात प्रमाणापेक्षा मोठ्या संख्येने वाळू उपसा सुरु असल्याचे निर्दशनास आले. लिलाव देताना जे नियम व अटी घालून दिल्या होत्या, त्याचे कुठेच पालन होतांना दिसत नसल्याने जिल्हाधिकारी यांनी कारवाई केली. या कारवाईमध्ये 22 वाळू उपसा करणार्‍या बोटी, 10 ट्रक, 17 ट्रक्टर, 2 जेसीबी असा सुमारे दोन कोटी 40 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी देवदैठणचे मंडलाधिकारी महंमद इकबाल जाफर खान यांच्या फिर्यादी वरुन रमेश बाळू चासकर, विश्‍वनाथ कोंडीबा चौरे, प्रशांत शिवाजी गाडिलकर, देवीदास राठोड यांच्यासह 31 जणांवर अवैध वाळू उपसा करणे, अवैधरित्या वाळू साठवणुक करणे, चोरुन वाळू वाहतूक करणे, पर्यावरणाचे नुकसान करणे, वाळू लिलावातील अटी व शर्तीचा भंग करणे व शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या आरोपींपैकी वरील चार जणांना अटक केली असून सर्व वाहने तहसील कार्यालयात आणण्यात आली आहेत.
जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या पथकाने नदीपात्रात छापा टाकल्यानंतर अवैध वाळू उपसा करणार्‍यांची पळापळ झाली. वाळू उपसा करणार्‍या वाहनाचे चालक व मालक गाड्या सोडून निघुन गेले. दिनांक 26 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास सुरु केलेली कारवाई पहाटे तीन वाजेपर्यंत सुरु होती. नदी पात्रातील सर्व वाहने जमा करण्यात आल्यानंतर दुसर्‍या दिवशी  27 रोजी दुपारी पाच वाजेपर्यंत पंचनामा करण्यात आला. या वाहनांचे चालक मालक निष्पन्न होण्यास अडचण येत असताना अनेक वाहनाच्या चाव्या नसल्याने ही वाहने एका जागेवर जमा करताना पथकाला अनेक  अडचणी आल्या.

LEAVE A REPLY

*