माका येथे सिमेंट चोरी करताना रंगेहाथ पकडले

0
माका येथे चोरी करताना रंगेहाथ पकडलेल्या आरोपींसमवेत सहाय्क पोलीस निरीक्षक कैलास देशमाने व पथकातील सहकारी.

सोनई पोलिसांची कारवाई; आरोपीवर सोनई व पाथर्डीत तीन गुन्हे दाखल

सोनई (वार्ताहर) – सिमेंट गोण्या व पाईपची चोरी करणार्‍या सराईत आरोपीस माका ग्रामस्थांच्या सहकार्याने रंगेहाथ पकडण्यात सोनई पोलिसांना यश आले. गुरुवारी 6 सप्टेंबरच्या रात्री या आरोपीला पकडण्यात आले. त्याच्यावर सोनई पोलीस ठाण्यात दोन व पाथर्डी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. याबाबत माहिती अशी की, सोनईचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांना माका ग्रामस्थांकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, माका जिल्हा परिषद शाळेच्या बंद खोलीत रस्ता काम ठेकेदार अशोक गडाख यांचे 39 गोण्या सिमेंट व फिनोलेक्स पाईप असे 12 हजार 900 रुपये किमतीचे सामान ठेवलेले असून माका येथीलच एकजण हे सामान चोरून नेत आहे.

या माहितीनुसार स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सोनई पोलीस पथकाने माका येथे सापळा रचला. त्यानुसार 6 सप्टेंबरच्या रात्री आरोपी खंडू गोपीनाथ लोंढे (रा. माका, ता. नेवासा) याने बंद खोलीचे कुलूृप तोडून आत प्रवेश केला. सिमेंट गोण्यांची चोरी करताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. खंडू लोंढे याने यापूर्वी वेळोवेळी चोर्‍या केलेल्या असल्याचे पोलिसांना समजले. माका येथील सिमेंट चोरी प्रकरणी खंडू गोपीनाथ लोंढे याच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच आरोपीविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात सन 2009 मध्ये भारतीय दंड विधान कलम 379, 511, 34 प्रमाणे तर पाथर्डी पोलीस ठाण्यात याच वर्षी गुन्हा रजिस्टर नं.248 नुसार भारतीय दंड विधान कलम 457, 380 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

पोलीस पथकात हेड कॉन्स्टेबल गर्जे, हेड कॉन्स्टेबल कारखिले, चव्हाण, गावडे, पोलीस नाईक शिवाजी माने, पोलीस नाईक किरणकुमार गायकवाड, कॉन्स्टेबल काका मोरे, मुळे, ठोंबरे आदींचा समावेश होता. या आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

LEAVE A REPLY

*