Friday, April 26, 2024
Homeनगरशिरूर बँक दरोड्यातील दरोडेखोर जेरबंद, मुख्य सूत्रधार निघोजचा

शिरूर बँक दरोड्यातील दरोडेखोर जेरबंद, मुख्य सूत्रधार निघोजचा

पुणे | प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर दरोडा टाकून २ कोटी किमतीचे सोने व ३१ लाख रुपयांची रक्कम चोरणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.

- Advertisement -

याप्रकरणी पोलिसांनी ५ दरोडेखोरांना अटक केली आहे. विशेष म्हणजे यातील मुख्य सूत्रधार धोंडीबा महादु जाधव हा पारनेर तालुक्यातील निघोज येथील आहे. त्याला निघोजमधूनच अटक केली. त्याच्यावर वाळू तस्करी व जुगारी आदी गुन्ह्यांची नोंद आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार अन्य साथीदारांना त्यांच्या त्यांच्या गावातून अटक केली.

डॉलर ऊर्फ प्रवीण सिताराम ओव्हाळ ( रा. वाळद, खेड), अंकुर महादेव पावळे (रा. कावळपिंपरी, जुन्नर), धोंडीबा महादु जाधव (रा. निघोज कुंड, पारनेर, नगर), आदिनाथ मच्छिद्र पठारे ( रा.पठारवाडी, पारनेर, नगर), विकास सुरेश गुंजाळ (रा. टाकळी हाजी, ता. शिरूर) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.

पिंपरखेड येथे २१ ऑक्टोबरला दुपारी पाच दरोडेखोर हातात रिव्हॉल्व्हर घेऊन महाराष्ट्र बँकेत घुसले. एक जण दरवाजामध्ये थांबला तर चौघे आत केबिनमध्ये शिरले. त्यांनी मॅनेजर व रोखपाल यांना पिस्तुलचा धाक दाखवीत जीवे मारण्याची धमकी दिली. आणि लॉकरच्या चाव्या घेतल्या. त्यानंतर तेथील सुमारे दोन कोटी रुपयांचे सोने व ३१ लाख रुपये रोख असा दोन कोटी ३१ लाख रुपयांचा ऐवज पोत्यात भरून पलायन केले. या गाडीवर प्रेसचा मोठा बोर्ड लावण्यात आलेला होता. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. त्यांनी काळे जर्किन डोक्यापर्यंत पूर्ण व तोंडाला मास्क लावले होते.

ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस पथकाने शिरूरचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व टीमने तपासाचे सूत्र हातात घेतले. पुणे पोलिसांना आणखी एक माहिती मिळाली ज्यात दरोडेखोरांपैकी एक जण अहमदनगरच्या निघोज भागात येणार असल्याचं कळलं. यानंतर पुणे पोलिसांनी सापळा रचत निघोज गावाजवळ आरोपी येताच त्याला पकडलं. यानंतर तपासादरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबुल करत एका शेतात दागिने आणि रक्कम लपवल्याचं सांगितलं. पुणे पोलिसांनी हा मुद्देमाल आपल्या ताब्यात घेतला आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गेल्या तीन महिन्यांपासून या दरोड्याची योजना आखली होती. या दरोड्यात आरोपींनी २ चारचाकी गाड्यांचाही वापर केला. दरोडा टाकल्यानंतर त्यांनी गाडी मध्य प्रदेशात नेऊन गाडीचा रंग बदलून ग्रे वरुन पांढरा केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या