Thursday, April 25, 2024
Homeनगरपिस्टलच्या गोळ्या लागून मृत झालेल्या पतीच्या गुन्हा तपासकामी पत्नीस अटक

पिस्टलच्या गोळ्या लागून मृत झालेल्या पतीच्या गुन्हा तपासकामी पत्नीस अटक

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

पिस्टलच्या दोन गोळ्या लागून गंभीर जखमी व नंतर मयत झालेले रामजी सातपुते प्रकरणात शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांनी सखोल तपास केला.

- Advertisement -

मयताच्या पत्नी शांताबाई सातपुते यांच्याविरुध्द पुरावा मिळाल्याने गुन्हा दाखल करून त्यांना पुढील तपासकामी अटक केली. गुरुवारी (दि. 24) आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना (सोमवार दि. 28) चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

शास्त्रीनगर येथील रामचंद्र उर्फ रामजी साहेबराव सातपुते यांना दि. 8 सप्टेंबर 2013 रोजी रात्री 1.30 च्या सुमारास पिस्टलच्या दोन गोळ्या लागून ते गंभीर जखमी होऊन मृत पावले होते. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन मयताची पत्नी शांताबाई सातपुते यांच्या विरुध्द दि. 30 डिसेंबर 2017 रोजी भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

यानंतर पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांकडे वर्ग केला होता. सदर गुन्ह्याचा उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांनी बारकाईने तपास केला. विभाग प्रमुख न्याय वैद्यक विभाग घाटी रुग्णालय, औरंगाबाद तसेच बॅलेस्टीक तंत्रज्ञ, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोग शाळा, मुंबई यांच्याकडून अभिप्राय प्राप्त करून घेतला.

यामध्ये आरोपी शांताबाई सातपुते यांच्या विरुध्द पुरावा मिळून आल्याने या गुन्हाच्या तपासकामी दि. 23 डिसेंबर 2020 रोजी त्यांना अटक केली. गुरुवारी (दि. 24) प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्याकडे हजर केले असता न्यायालयाने सोमवार (दि. 28) पर्यंत शांताबाई यांना पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी दिली.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलीस कॉ. नितीन दराडे, पोलीस नाईक संजय बडे, पो.कॉ. रोहिणी घरवाढवे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या