पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ

पाथर्डी पोलीस ठाण्यात चौघांसह अन्यविरोधात गुन्हा दाखल
पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

माहेरहून घर घेण्यासाठी पाच लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहीतेचा शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याप्रकरणी

पाथर्डी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये पती, सासू, सासरा, नणंद यासह अन्य नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण भास्कर हावणे असे पतीचे नाव असून यासह अन्य सहा नातेवाईकांचाही या गुन्ह्यात समावेश आहे. सीमा लक्ष्मण हावणे वय-28, रा.खडकी (देवळा) ता.वडवणी, जिल्हा बीड, (हल्ली रा.कसबा पेठ,पाथर्डी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सीमा हावणे यांचा 28 डिसेंबर 2018 रोजी लक्ष्मण हावणे याच्याशी विवाह झाला. तीन महिने व्यवस्थित गेल्यानंतर पत्नी पतीसोबत पुणे येथे राहायला गेली होती. त्यानंतर पुन्हा गावी आल्यानंतर काही महिन्यांपासून सीमाचा छळ करण्यास सुरुवात झाली.

तुला घर काम जमत नाही, तुला शेतीतील कामे ही येत नाहीत, असे म्हणून घरातील नातेवाईक मानसिक छळ करू लागले व त्रास देण्यास सुरुवात केली.त्यानंतर तूला पतीकडे राहायचे असेल तर घर घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावे अशी मागणी तिच्याकडे घरच्यांकडून केली जात होती. तसेच तिला शिवीगाळ व मारहाण केली जात असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी सिमा हावणे (28, कसबा पेठ पाथर्डी,) या विवाहितेने पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून पती लक्ष्मण हावणे(रा.खडकी,जि. बीड) सासु वेणूबाई भास्कर हावणे, सासरा भास्कर नामदेव हावणे, दीर कृष्णा भास्कर हावणे (सर्व रा.खडकी जि.बीड), ननंद सुनीता रामदास गचांडे,रामदास बाबुराव गचांडे (रा. शिरसमार्ग जि. बीड,)मामे सासरे मच्छिंद्र शेटे (रा. करचुंडी बीड)यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या महिलेला एक वर्षाची लहान मुलगी असुन वडिलांची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. बाळंतपणासाठी माहेरी आल्यावर ही तिचा मानसिक छळ करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विवाहितेच्या तक्रारीनुसार पतीसह अन्य नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित डेरे करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com