Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

वडाळा महादेव परिसरात तुंबळ हाणामारी

Share
पत्नीच्या मदतीने मजुर महिलेवर अत्याचार, Latest News Crime News Shrigonda Torture

गावठी कट्टा, तलवारीचा वापर

वडाळा महादेव (वार्ताहार)- श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव परिसरात कबड्डी खेळात झालेल्या किरकोळ वादावरून टाकळीभान, पाचेगाव व श्रीरामपूरमधील तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. यामध्ये गावठी कट्टा, तलवार व लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आल्याने या भागात काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. रात्री उशिरापर्यंत या तरुणांचा शोध पोलीस घेत होते.
नेवासा रोडवरील कॉलेज परिसरामध्ये काल दुपारी साडेतीनच्या दरम्यान दोन गटांमध्ये किरकोळ वादातून दगडफेक झाली.

त्यानंतर काही तरुण श्रीरामपूरच्या दिशेने मोटारसायकलवरून निघाले व त्यांचा पाठलाग करत वडाळा महादेव येथील नेवासा रोडवरील मंगल कार्यालय परिसरात आले. यावेळी पुन्हा तरुणांमध्ये दगडफेक सुरू झाली. याचवेळी श्रीरामपूरच्या दिशेने मोटारसायकलवर काही तरुण हत्यारासह आल्याने त्यांनी गावठी कट्ट्यामधून दोन ते तीन फैरी झाडल्या तसेच तलवारीचा धाक दाखवत परिसरात दहशत निर्माण करत तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

या घटने दरम्यान परिसरामध्ये असलेल्या व्यावसायिकांना काय चाललय काहीच कळेना त्यामुळे येथील एक तरूण घराबाहेर येऊन उभा राहिला. त्यावेळी त्याच्या दिशेने दोन तरुण तलवारी व गावठी कट्टा घेऊन मागे लागल्याने त्याने घरी जाऊन दरवाजा बंद करून घेतला. यावेळी त्याच्या दरवाजावर तलवारीने वार केले व पळताना त्याच्या दिशेने फायर केला. सुदैवाने हा तरुण घरात असल्याने तो बचावला.

यावेळी काही तरुण रोडवरील हार्डवेअर दुकानांमधून विक्रीस ठेवलेले दांडके घेऊन पळाले. घटनेच्या दरम्यान अग्रवाल मंगल कार्यालयासमोर निवडणूक बंदोबस्तासाठी शासकीय अधिकारी तसेच पोलीस अधिकारी नेमणुकीस असल्याने गावठी पिस्तुलामधून निघालेला आवाज ऐकल्याने त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. दंगा करणार्‍या तरुणांनी पोलिसांना पाहताच मिळेल तिकडे रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला. काही तरुण मोटारसायकली सोडून अशोकनगरच्या दिशेने पळाले व बाकीचे कार्यालयाच्या बाजूने पळाले.

घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट हे पथकासह तात्काळ दाखल होत घटनेतील तरुणांची शोधमोहीम करण्यासाठी पथक नेमून टाकळीभान तसेच अशोकनगर परिसर येथे रवाना केले. या तरुणांच्या मोटारसायकली रोडवर उभ्या असल्याने त्यावरून तरुणांची माहिती घेण्यात आली.

वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, सुनील दिघे, पंकज गोसावी, पानसंबळ, लोंढे, अमोल गायकवाड, जोसेफ साळवी, शैलेंद्र सगळगिळे, पो.ना. रवींद्र उघडे, गृहरक्षक दलाचे देसाई, आर. बी. कदम आदी पोलीस कर्मचारी तरुणांचा शोध घेत आहेत.
याबाबत काही तरुणांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!