Thursday, April 25, 2024
Homeनगरपानोडीत विवाहित महिलेवर अत्याचार

पानोडीत विवाहित महिलेवर अत्याचार

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील पानोडी परिसरातील एका 35 वर्षीय विवाहित महिलेवर नातेवाईकाने बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली.

- Advertisement -

पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या काही तासांत पोलिसांंनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी पानोडी याठिकाणी कुटुंबियांसमवेत राहत असून आमचे नातेवाईक अण्णा लहानु घुगे यांची पत्नी पुणे येथे कामाला असल्याने ते, पत्नी व मुले पुण्याला राहतात. शेतीतील कामानिमित्त अण्णा घुगे हे पानोडीला येत असतात. मागील आठ दिवसांपासून शेतीच्या कामासाठी ते गावी आले होते.

दि. 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास मी आमच्या शेतात गवत कापण्यासाठी गेले असताना अण्णा घुगे तेथे आला व माझ्या अंगाला झटू लागला. मला तुझ्यावर प्रेम करायचे आहे असे म्हणत मला शेताच्या कडेला घेऊन गेला. मी विरोध केला असता त्याने मला न जुमानता माझ्यावर बळजबरीने अत्याचार करून पळून गेला. यामुळे मला अनेक ठिकाणी दुखापत झाली आहे. घरी येऊन मी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान आरोपी अण्णा लहानु घुगे याच्याविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने अवघ्या काही तासांत आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांंनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या