पतीच्या खुनासाठी पत्नीने दिली सुपारी

खुटवडनगर येथील प्रकार; अंबड पोलिसात गुन्हा दाखल

0
नवीन नाशिक | दि. १७, प्रतिनिधी- पतीची हत्या करण्यासाठी पत्नीनेच दहा लाखांची सुपारी दिल्याचा व संबंधित पतीला सासू-सासरा, साला व स्वत: पत्नीनेच बेदम मारहाण करण्याचा प्रकार खुटवडनगर येथे घडल्याचे उघडकीस आले असून पत्नी पिडीताच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी चंद्रदीप दौलत सोनवणे (३९, रा. सोहम् प्लाझा, खुटवडनगर, नाशिक) यंनी दिलेल्या तक्रारीनुसार पत्नी दीपमाला सोनवणे, सासरा सयाजी जाधव, सासू निर्मला जाधव, मेहुणा प्रवीण जाधव व दोन अज्ञातांनी मंगळवारी दि. १६ रोजी सकाळी घरात घुसून बेदम मारहाण केल्याची तसेच तुला मारण्यासाठी १० लाखांची सुपारी दिली असून फारकत घेण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली व दांडक्याने बेदम मारहाण केल्याची नोंद करण्यात आली आहे.
घटनेवेळी चंद्रदीप यास चाकूने धमकावत तुला संपविण्यासाठी १० लाखाची सुपारी दिली आहे. तू पत्नी दीपमाला हिला ५० लाख रुपये आणि फारकत दे तसेच याबाबत पोलिसांकडे गेला तर तुझा खून करु अशी धमकी दिल्याची तक्रार पत्नीपिडीत चंद्रदीप सोनवणे यांनी केली आहे. घटनेवेळी दोन अज्ञात संशयितांनी सोनवणे यांच्या घरातील फोन व टीव्ही पळवून नेल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रार दाखल होताच पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे, स.आयुक्त मोहन ठाकूर, व.पो.नि. मधुकर कड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. जखमी सोनवणे यास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्रदीप सोनवणे हा सातपूर येथे एका कंपनीत उच्चपदावर कार्यरत असून त्याचे सासरे व मेहुणा देखील त्याच कंपनीत कामाला आहेत. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांविरोधात भा.दं.वि. कलम ३२६, ४५२ व ३८७ अन्वये गुन्हा दाखल केला असून स.पो.नि. विशाल मुळे पुढील तपास करीत आहेत.

पती किंवा सासरच्यांकडून सुनेचा छळ झाल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. मात्र पत्नीच पतीच्या जीवावर उठल्याचे उदाहरण क्वचितच बघायला मिळते. जखमी सोनवणेंच्या तक्रारीवरून संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घडलेला प्रकार गंभीर आहे. पोलीस सर्व शक्यतांची पडताळणी करून तपास करीत आहेत. – मधुकर कड (व.पो.निरीक्षक. अंबड पोलीस ठाणे)

LEAVE A REPLY

*