मोखाड्यात गावठी दारुभट्टी उद्ध्वस्त

0
मोखाडा ।  आदिवासीबहुल मोखाडा तालुक्यातील सायदे पैकी बोरीचीवाडी येथे कारवाई करत जंगलात सायदे डॅमच्या बाजूला असलेली गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त करण्यात आली. बर्‍याच दिवसांनंतर ही कारवाई करण्यात आल्याने गावठी दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

सदर कारवाईत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल सापडला असून स्थानिक तीन व्यक्तींवर मुंबई प्रोव्हिजन अ‍ॅक्टनुसार कलम 65 (फ), 65 यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गंगाराम शिवराम झुगरे, अनंता निरगुडे, बबन निरगुडे या तिघा संशयितांचा समावेश आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाड टाकताच हे तीनही आरोपी येथून पसार झाले.

मात्र त्या ठिकाणी असलेला मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. या मुद्देमालात 30 लिटर हातभट्टीची गावठी दारू, 2,800 लिटर दारू बनवण्याचे रसायन 14 बँरलमध्ये आढळून आले. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या मुद्देमालाची अंदाजे रक्कम 70,500 एवढी आहे.

पुढील कारवाई लवकरच करणार असल्याचे मोखाडा पोलीस ठाण्याचे व.पो.नि. प्रकाश सोनावणे यांनी सांगितले. या कारवाईत पी.एस. वीटकर, आर.एस.नेहरे, के.सी.कव्हा, जे.एस.जाधव, आर.जे.पाटेकर, आर.एन.दुर्गेश, एम.ए.भरसट, एच.व्ही.डामसे, अनिता गुंजाळ, गीता पठारे, विद्या साबळे, कौशल्या शिंदे, रोहिणी बोरसे आदींनी सहभाग घेतला.

अनेकांचे संसार उद्ध्वस्त : दारू पिण्यापायी अनेकाचे संसार उद्ध्वस्त झाल्याच्या अनेक घटना घडत असतात. अती दारू सेवनामुळे मुलांच्या शिक्षणाकडेदेखील दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी संपूर्ण पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात राजरोसपणे चालत असलेले अवैध दारू धंदे बंद करण्याचा निर्णय घेतला.

या आदेशान्वये तसेच अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण व डीवायएसपी सुरेश घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच मोखाडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रकाश सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली 15 पोलीस कर्मचार्‍यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

*