Type to search

Featured मुख्य बातम्या राजकीय सार्वमत

कळमकरांसह 30 जणांविरोधात गुन्हा दाखल

Share

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधील वादावादी : पोलीस बनले फिर्यादी

अहमदनगर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नगर शहरातील मेळाव्यानंतर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांत राडा झाला. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून फिर्याद न दिल्याने अखेर कोतवाली पोलिसांनी सरकारतर्फे याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलीस कर्मचारी प्रमोद लहारे यांच्या फिर्यादीवरून अभिषेक कळमकर यांच्यासह 30 जणांविरुद्ध गैर कायद्याची मंडळी जमवून हाणामारी करण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मेळाव्यानंतर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार संग्राम जगताप समर्थकांनी माजी महापौर अभिषेक कळमकर यांना हाणमार केली होती. मात्र, पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर कळमकर फिर्याद न देताच घरी परतले. माजी महापौर कळमकर हे कार्यकर्त्यांसमवेत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. आमदार जगताप, शहराध्यक्ष माणिकराव विधाते आणि नगरसेवक यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दादाभाऊ कळमकर आणि अभिषेक कळमकर यांची समजूत घातली. यानंतर सर्वजण गुन्हा न नोंदवता एकाच गाडीत बाहेर पडले.

मात्र, पोलीस कर्मचारी लहारे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी माजी महापौर अभिषेक कळमकर, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे, राष्ट्रवादीचे संतोष लांडे, वैभव वाघ, बाबा गाडेकर, सुरेश बनसोडे, तोसिफ शेख, संतोष ढाकणे, जय लोखंडे व इतर 15 ते 20 जणांविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून आपसात भांडण करून शिवीगाळ, दमदाटी करून पोलिसांसमोर झुंज केल्याबाबतचा गुन्हा नोंदवला आहे.पुढील तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ करत आहेत. यामुळे राष्ट्रवादीमधील गटबाजी पुन्हा उफाळून येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने पक्षाच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!