संगमनेर : 55 लाखांहून अधिक अपसंपदा प्रकरण; सेवानिवृत्त लोकसेवकासह कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा

0
तळेगाव दिघे (वार्ताहर) – मोटार वाहन निरीक्षक (वर्ग 1) असतानाच्या लोकसेवक कालावधीत सूर्यभान रेवजी झोडगे (वय 62) यांनी ज्ञात स्रोतांपेक्षा 29 टक्के अधिक अपसंपदा जमविली. 55 लाखांहून अधिक माया जमविल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असून तसा त्यांच्यावर आरोप आहे.
याप्रकरणी त्यांच्यासह कुटुंबीयांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. संगमनेर तालुक्यातील नान्नजदुमाला येथील सूर्यभान रेवजी झोडगे (वय-62) हे मोटार वाहन निरीक्षक

(वर्ग-1) या लोकसेवक पदावर असताना माहे नोव्हेंबर 1999 ते माहे ऑक्टोबर 2012 या वाहन परीक्षण कालावधीत त्यांनी ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक अपसंपदा (संपत्ती) जमविली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आलेली होती. चौकशीत झोडगे यांनी ज्ञात स्रोतापेक्षा 29 टक्के अधिक मालमत्ता जमविल्याचे निष्पन्न झाले. 55 लाख 14 हजार 956 रुपये इतकी अपसंपदा जमविण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.

याप्रकरणी नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्याम रामचंद्र पवरे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी सूर्यभान रेवजी झोडगे (सेवानिवृत्त मोटारवाहन निरीक्षक), अलका सूर्यभान झोडगे, विपुल सूर्यभान झोडगे, भूषण सूर्यभान झोडगे (सर्व रा. नान्नजदुमाला ता. संगमनेर) या चौघांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 9/2017 लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1998 चे कलम 13 (1), (इ) सह 13 (2), भारतीय दंड संहिता कलम 109 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अपसंपदा जमविल्याचा या गुन्ह्यात अधिक माया जमविल्याचे उघड होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कसून तपास सरू केला आहे. मात्र याप्रकरणी अद्याप एकाही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक विष्णुनाथा ताम्हणे अधिक तपास करीत आहे. सेवानिवृत्त लोकसेवकाविरुद्ध अपसंपदा जमविल्याचा गुन्हा दाखल झाल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

LEAVE A REPLY

*