जिल्ह्यात 26 महिलांवर अत्याचार

0
67 पोक्सोचे गुन्हे दाखल
अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात खून, चोर्‍या, दरोडे, घरफोड्या या घटनांच्या पाठोपाठ महिला अत्याचाराच्या घटनांनी हद्द पार केली आहे. गेल्या सहा महिन्यांत 25 महिलांवर बलात्कार झाले असून 48 मुलींच्या छेडछाडीच्या घटना घडल्या आहेत. तसेच 67 गुन्हे बाललैंगिक (पोक्सो) अत्याचाराचे घडले असून 126 अल्पवयीन मुलांचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. इतकेच काय तर कोपरगावमध्ये एका जनावरावर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षीततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचे चित्र दिसत असून जनावरे देखील सुरक्षीत राहिले नाहीत असे स्पष्ट झाले आहे.
राज्यस्थानमध्ये एका वर्षात 936 बालअत्याचाराचे गुन्हे दाखल होतात. तेच प्रमाण महाराष्ट्रात 926 इतके आहे. तर राज्यात रोज लैंगिक अत्याचार 92 घटना घडतात. यातून तुलनात्मक विचार करता, नगर जिल्ह्यात प्रती आठवड्यात एक अत्याचाराची गंभीर घटना घडत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या नकाशात गुन्हेगारीत नगर अव्वल असले तरी पुरोगामी म्हणून ओळख असणारा जिल्हा महिला अत्याचाराच्या घटनेत देखील मागे नसल्याचे लक्षात आले आहे. अन्य जिल्ह्यांच्या सरासरीत नगरचा क्रमांक अग्रस्थानी असून स्त्री अत्याचाराच्या घटनांचे सर्वाधिक राजकारण याच जिल्ह्यात केले जात असल्याचे बोलले जाते. त्याचे उदाहरण कोपर्डी, खर्डा, कोपरगाव, तिसगाव या घटनांनी दाखवून दिले आहे.
खरे पाहता आज मुलगी अल्पवयीन आहे की, शालेय, आरोपी लहान आहे की मोठा याकडे कोणीही लक्ष देत नाही. अत्याचाराची घटना कानावर पडल्यानंतर पहिला प्रश्न विचारला जातो, मुलगी मुलगा कोणत्या जातीचा आहे. खरंतर हे वेड सर्वसामान्य माणसांना नाही. तर समाजात जातीचे प्रतिनिधीत्व करणार्‍या संधीसाधू लोकांना आहे. त्यामुळे येथे अत्याचार हे जातीच्या विरुद्ध जोडीत असेल तरच त्याला मूल्य प्राप्त होते. अन्यथा एकाच जातीच्या अत्याचाराला समाजात कोणतेही महत्त्व दिले जात नाही.
इतक्या नीच पातळीवर समाज व्यवस्था जाऊन पोहचली आहे. अत्याचार करणारे नराधम किती विकृत असू शकतात हे मानवी कल्पनेच्या पलिकडे गेले आहे. नगरच्या रेल्वे स्थानकावर अवघ्या दोन वर्षाच्या चिमुरड्या मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. या मुलीने मरणप्राय यातना सोसून दुसरा जन्म घेतला. या मुलीचे आई-वडील भिकारी असून ते दोन वेळचे अन्न खाण्यास मुश्किल आहेत. तरीदेखील पीडित मुलीस पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आज हेच पालक त्या मुलीस पुन्हा रेल्वे स्थानकावर हात सावरण्यासाठी उभे असल्याचे चित्र दिसत आहे. ही घटना घडल्यानंतर आमदार, खासदार, पोलीस, पदाधिकारी या सगळ्यांनीच फोटोसेशन केले. माध्यमांच्या जोरावर हवी तशी प्रसिद्धी मिळविली. मात्र राजकीय शो अटोपल्यानंतर ही मुलगी त्याच यातना पुन्हा-पुन्हा सोसत आहे. असाच अत्याचाराचा प्रकार गेल्या दोन आठवड्यांपूर्वी कोपरगाव येथे झाला होता. त्याचे पडसाद जिल्हाभर उमटले. मात्र, पीडित मुलगी अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.
आज तिसगाव येथे घडलेली घटना पाहिली तर आपण माणूस म्हणून घेण्यास लाजवेल अशी आहे. ज्या माउलीला वाटत होते, माझी मुलगी शिकावी, मोठी व्हावी. हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी शाळेचा मार्ग अवलंबविला होता. मात्र शाळेच्या रस्त्यातच 45 वर्षांच्या एका नराधमाने तिचा घात केला. या वेदना शब्दांनी मनाला सुन्न करतात, तर या चिमुरड्या बालकांनी हे प्रत्यक्षात सोसले आहे. त्यामुळे त्याच्या काल्पनीक वेदना प्रत्येकाच्या मनाला छेदणे गरजेचे आहे. तरच माणसातला माणूस जागा राहणार आहे.
माणुसकीला काळिमा फासणार्‍या घटना इथेच थांबलेल्या नाहीत. काल तर नगर तालुक्यातील एका पहाडावर देवदर्शनासाठी आलेल्या एक 65 वर्षांच्या वृद्ध महिलेवर 27 वर्षाच्या तरुणाने अत्याचार केला. ज्या स्त्रीकडे पाहिल्यानंतर सहज मातृत्व जागे होईल, अशा व्यक्तीवर अत्याचार करण्याचे अघोरी सामर्थ्य ज्या माणसात निर्माण होते. त्याला सराईत, आरोपी, गुन्हेगार ही शब्द शुल्लक आहेत. अशा नराधमांना कायदेशीर कडक शासन झाले पाहिजे. असे झाले तरच अशा प्रकारच्या अत्याचारांवर जरब बसणार आहे. अन्यथा माणसं काही दिवसात जनावरांप्रमाणे वागतील असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

जिल्हा ढवळून टाकणार्‍या घटना  –
कोपर्डीतील निर्भया प्रकरण, भांबोरा घटना, नांदगाव प्रकरण, कोपरगाव प्रकरण, तिसगाव, मांढवे प्रकरण, नगर रेल्वे स्थानकावरील अत्याचाराची घटना, वारुळवाडी येथे वृद्ध महिलेवर अत्याचार, श्रीरामपूर येथे सामूहिक अत्याचार, केडगाव अत्याचार प्रकरण, नगर तालुक्यातील मतीमंद मुलीवरील अत्याचार, मंत्र्याच्या अंगरक्षकाचा राहुरीच्या तरुणीवर अत्याचार, अकोल्यात अल्पवयीन मुलीवर व कोपरगावमध्ये जनावरावर बलात्कार अशा अनेक घटनांमुळे जिल्हा ढवळून निघाला आहे.

अकोले तालुक्यात महिला अत्याचाराच्या सर्वात जास्त घटना घडल्या आहेत. आदिवासी दुर्गभ भागात अशा प्रकारचे अनेक अत्याचार होतात. मात्र प्रशासनाबाबत अज्ञान व झाकली मूठ सव्वा लाखाची या म्हणीप्रमाणे गुन्हे दडपले जातात. त्या पाठोपाठ श्रीगोंदा, नेवासा, श्रीरामपूर, संगमनेर, नगर शहर, तालुका, पारनेर या ठिकाणी महिला अत्याचाराचे प्रमाण सर्वाधिक आहे.

अत्याचाराच्या घटना –

   महिना   अपहरण   विनयभंग बलात्कार पोक्सो 

जानेवारी    21       10         2        12     

फेब्रुवारी     22       12         5        17 

  मार्च       35       12        4        04 

 एप्रिल       25       10       3         07  

  मे           22       04       8        14

 

LEAVE A REPLY

*