बेग टोळीला जेलचे गज कापण्यास हेक्साचे पान पुरविण्याचा प्रयत्न

0

नातेवाईक तरुणाचे पलायन, शाहरूख शेखसह चौघांचा कोठडीतील मुक्काम वाढला 

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर येथील बेग टोळीला जेलचे गज कापून पसार होण्यासाठी हेक्साचे पान पुरविण्याचा प्रयत्न त्याच्या नातेवाईकांनी केला. हा प्रकार जिल्हा न्यायालयाच्या आवारात घडला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा प्लॅन फसला. हे हेक्सापान पोलिसांनी ताब्यात घेतले असून नातेवाईक पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बेग टोळीच्या मुसक्या आवळल्या खर्‍या. मात्र त्यांच्यातील गुन्हेगारी त्यांना शांत बसू देत नाही. जेलमधून बाहेर कसे पडता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी (दि.29) बेग टोळीतील शाहरुक रज्जाक शेख (रा. निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर), दीपक मांजीनाथ वाघ, बारकू सुदाम आंभोरे, सागर सोना पगारे (रा. चितळी. ता. राहाता) यांची पोलीस कोठडी संपत होती.
त्यासाठी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी स्वत: हजर राहून चौघांना न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाच्या आवारात असताना मोठी गर्दी जमा झाली होती. यावेळी आरोपींचे काही नातेवाईक त्यांच्या आसपास फिरत होतेे. हा प्रकार पोलीस निरीक्षक पवार यांच्या लक्षात आला. आरोपींना पोलीस कोठडी मिळण्यासाठी न्यायालयात हजर केले असता एका कोपर्‍यात बसविण्यात आले होते.
या दरम्यान काही व्यक्ती त्यांच्या नजीक येऊन बसल्या. पोलिसांची नजर चुकवून त्यांनी हेक्साचे पान आरोपींना देण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार एका कर्मचार्‍याने पाहिला असता तो गर्दीतून पुढे झाला. मात्र पोलिसांची सतर्कता पाहून त्याने पळ काढला. यावेळी पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र तो पसार झाला होता. पोलिसांनी जर सतर्कता बाळगली नसती तर आरोपींनी त्या हेक्सापानचा गैरवापर देखील केला असता. न्यायालयाच्या आवारात मोठा अनर्थ घडला असता. किंवा पोलिसांनी जेलमध्ये असताना पोलिसांची नजर चुकवून जेलचा गज कापला असता व पसार झाले असते. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांनी दक्ष पोलिसांचे कौतूक केले आहे.

2 तारखेपर्यंत पोलीस कोठडी – आरोपींवर अनेक मोठे गुन्हे आहेत. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. तसेच पसार आरोपी लखन प्रकाश माखीजा, अर्जुन खुशाल दाभाडे (रा. गोंधवणी), रितेश आसाराम काटे (रा. संजयनगर, श्रीरामपूर) व सुधीर काळोखे (रा. श्रीरामपूर) यांचा शोध घेऊन अटक करणे आहे. या तपासासाठी चौघांना गुरुवार दि.2 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

 

LEAVE A REPLY

*