पानेगावात 2 हजार जनावरांच्या कातडीची वाहतूक करणारा टेम्पो पकडला

0

चालक-मालक पसार; सोनईला गुन्हा दाखल

सोनई (वार्ताहर)- सोनई जवळच्या पानेगाव येथील मुख्य चौकात स्थानिक ग्रामस्थांनी 2 हजार जनावरांची कातडी विक्रीसाठी घेऊन जाणारा आयशर टेम्पो पकडून सोनई पोलिसांच्या ताब्यात दिला. वाहनचालक व कातडी विक्री करणारे साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले.
याबाबत सोनई पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल शिवाजी माने यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, सहाय्यक निरीक्षक किरण शिंदे, पोलीस नाईक धोत्रे, कॉन्स्टेबल पवार यांचे पथक 12 सप्टेंबर रोजी रात्री हद्दीत गस्त घालत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शिंदे यांना पानेगावचे पोलीस पाटील बाबासाहेब पोपटराव जंगले यांचा फोन आला की, पानेगावच्या मुख्य चौकात ग्रामस्थांनी टेम्पो पकडून ठेवला आहे.
सोनई पोलीस ठाण्याच्या जीपमधून पथक घटनास्थळी पोहचले. तेथे आयशर कंपनीचा टेम्पो (क्र. एमएच 11 एएल 3643) ग्रामस्थांनी पकडून ठेवला होता. त्यात जनावरांची मांसवजा कातडी होती. चौकशी करता टेम्पो चालकाचे साथीदार पळून गेलेले होते. हा टेम्पो नेवासा, निंभारी, अंमळनेर, पानेगाव मार्गे बाहेर जात असल्याची माहिती मिळाली असून टेम्पो पकडणेकामी पोलीस पाटील बाबासाहेब जंगले अमोल शंकर कापसे, लक्ष्मण जंगले, हरी पवार, किशोर जंगले, भाऊसाहेब गायके, योगेश घोलप आदी ग्रामस्थांच्या जागरुकतेने हा टेम्पो पकडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान सोनई पोलीस ठाण्यात या प्रकरणी सेकंड गुन्हा रजिस्टर नं. 53/2017 नुसार टेम्पो क्र. एमएढ़ 11 एएल 3643 हा 7 लाख रुपयांचा टेम्पो 1500 ते 2000 बेकायदा गाय, म्हैस, बैल आदी वर्गातील जनावरांचे मांस वजा कातडी विनापरवाना साठवणूक करून भरून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करण्याच्या आरोपावरून अज्ञातांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 429, महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5 (ब) व 5(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल एन. पी. सप्तर्षी करत आहेत.
काही दिवसांपूर्वी नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे गोवंश जनावरांच्या सुमारे 20 लाख रुपये किंमतीच्या कातडींचा साठा पकडण्यात आला होता. त्यानंतर चांद्यात गोमांस जप्त करण्यात आले होते. आता पानेगावात जनावरांची कातडीचा टेम्पो पकडण्यात आला. जनावरांची कत्तल करून मांस व कातडीचा व्यापार करणारी मोठी टोळी तालुक्यात कार्यरत असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

*