नातेवाईकाच्या अत्याचाराने विद्यार्थिनी गर्भवती

0

सारसनगरमधील नराधाम गजाआड, पत्नीने समजावूनही खोड गेली नाही

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील सारसनगर परिसरात राहणार्‍या अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अत्याचारानंतर पीडित मुलगी गरोदर असल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आले आहे. गुन्हा दाखल होताच कोतवाली पोलिसांनी ईश्‍वर नाथा तळेकर (रा. सारसनगर) यास अटक केली आहे.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मोलमजुरी करून उदरनिवार्ह करणार्‍या दाम्पत्याने शिक्षणासाठी मुलीला श्रीगोंदा येथे पाठविले. उन्हाळी सुटीमुळे जूनमध्ये ती सारसनगर येथे आईवडिलांकडे आली होती. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत नात्यातीलच व्यक्तीने तिला घरी घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार त्याच्या पत्नीने पाहिल्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर या घटनेवर तात्पुरता पडदा पडला होता. मात्र, सुट्टी संपल्यानंतर पीडित मुलगी श्रीगोंदा येथे शाळेत शिक्षणासाठी गेली.
31 ऑगस्ट रोजी पीडित मुलीस उलट्या होऊ लागल्यामुळे शिक्षकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांचा रिपोर्ट पाहून शिक्षक आवाक झाले. मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात येताच तिच्याकडून शिक्षकांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मग शिक्षकांनी पीडित मुलीचे समुपदेशन केले असता तिने घडलेला प्रकार कथन केला.
शिक्षकांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकून पीडित मुलीस पालकांच्या स्वाधीन केले. शुक्रवारी (दि. 1) रात्री याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी ईश्‍वर तळेकर हा एका रुग्णालयात डॉक्टरांना सहायक म्हणून काम करतो. शुक्रवारी रात्री सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, बापुूसाहेब म्हस्के, इस्त्राईल पठाण यांनी त्यास अटक केली आहे. आज तळेकरला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*