Type to search

क्रीडा

उद्या मुंबईसमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान

Share

मुंबई : तीन वेळचा आयपीएल चॅम्पियन यंदाच्या १२ व्या हंगामात पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर परतला आहे. चेन्नई, हैद्राबाद, पंजाबला पराभवाची धूळ चारल्यानंतर मुंबई संघ सलग चौथा सामना जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. उद्या मुंबईची गाठ राजस्थान रॉयल्सशी पडणार आहे. हा सामना शनिवारी १३ एप्रिल २०१९ रोजी वानखेडे मैदानावर होणार आहे. हा सामना सायंकाळी ४ वाजता खेळवण्यात येणार आहे.

मुंबई संघाचे ६ सामने झाले असून यात त्यांनी ४ विजय आणि २ पराभवांसह ८ गुणांची कमाई करताना गुणतालिकेत तिसरे स्थान गाठले आहे. तर अजिंक्य राहाणेचा राजस्थान संघ गुणतालिकेत तळाला आहे. राजस्थान संघाच्या खात्यात २ गुण जमा असून, त्यांना ६ सामन्यांमध्ये १ विजय आणि ५ पराभवांचा सामना करावा लागला आहे. स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखण्यासाठी राजस्थानला विजय अनिवार्य असणार आहे. तर मुंबई आपला पाचवा विजय संपादन करण्यासाठी उत्सुक आहे. राजस्थान संघाच्या फलंदाजीची मदार राहणे, बटलर, सॅमसन, स्मीथ यांच्यावर आहे. तर अष्टपैलूंमध्ये आर्चर, गौतम, स्ट्रोक्स आहेत गोलंदाजीत उनाडकट, आर्चर, धवल, श्रेयस गोपाल हे पर्याय आहेत.

मुंबई बद्दल सांगायचे झाले तर रोहीत, डिकॉक, सूर्यकुमार, युवराज, पोलार्ड चांगली फलंदाजी करत आहेत, पंजाबविरुद्ध रोहीतच्या अनुपस्थितीत पोलार्डने पंजाबविरुद्ध एकहाती सामना खेचून आणत मुंबईला विजय मिळवून दिला होता. राजस्थानला मुंबईला रोखणे सोपे नसेल. या मैदानावरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १७५ आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम क्षेत्रक्षणाला प्राधान्य देईल यात शंका नाही. पंजाबविरुद्ध सामन्यात नेट्समध्ये सराव करताना नियमित कर्णधार रोहीत शर्माला दुखापत झाली होती. तो या दुखापतीतून सावरल्यास संघात परतण्याची शक्यता आहे.

अष्टपैलूंमध्ये हार्दीक, पोलार्ड चांगली कामगिरी करत आहेत. कृणालला अद्याप आपल्या लौकिकाला साजेल अशी कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाजीत राहुल चहर, मयंक मार्कंडे, कृणाल पंड्या, बेरेंडॉफ, जोसेफ, बुमरा, मॅक्लेनघन आहेत. दोन्ही संघांची तुलना केल्यास मुंबई संघ अधिक संतुलित दिसत आहे .
आमनेसामने २१ राजस्थान विजयी ९, मुंबई विजयी ११, १अनिर्णित

हवामान : स्वछ सूर्यप्रकाश ५३% उष्णता राहण्याचा अंदाज…

यांच्यावर असेल लक्ष : रोहीत, पोलार्ड, हार्दीक पंड्या, बटलर, स्ट्रोक्स..

राजस्थान रॉयल्स : अजिंक्य राहणे, जोस बटलर, संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी, स्टीव्ह स्मीथ, बेन स्ट्रोक्स, के गौतम, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, सुदेशन मिडून ओशन थॉमस, वरूण एरन, धवल कुलकर्णी, जयदेव उनाडकट, महिपाल लॉनॉर, रियान प्र्राग, ईश सोधी, एस्टेन टूर्नर, शुभम रांझाने, लिम लिंगविस्टन, शशांक सिंग, स्टुअर्ट बिनी, आर्यमन बिर्ला, बेन स्ट्रोक्स, मनन वोहरा, प्रशांत चोप्रा.

मुंबई इंडियन्स : रोहीत शर्मा, क्विंटन डिकॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दीक पंड्या, कृणाल पंड्या, बेन कटिंग, युवराज सिंग, किरॉन पोलार्ड, सिद्धेश लाड, आदित्य तारे, अनुकूल रॉय, अनमोलप्रीत, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेनघन, अलझारी जोसेफ, जेसन बेरेंडॉफ, राहुल चहर, मयंक मार्कंडे, इविन लुईस , जयंत यादव, बरिंदर सरण आणि पंकज जयस्वाल.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!