Video : घरखरेदीचा होणार विक्रम; क्रेडाई’च्या गृहप्रदर्शनात हजारो नाशिककरांची हजेरी

0

देशदूत डिजिटल वृत्त

नाशिक, ता. २२ : आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो नाशिककरांनी आज डोंगरे वसतीगृह मैदानावर सुरू असलेल्या क्रेडाई मेट्रो या प्रॉपर्टी प्रदर्शनाला भेट देऊन गृह खरेदीमध्ये रस दर्शविल्याने यंदा घरविक्रीचा विक्रम होण्याची शक्यता बांधकाम तज्ज्ञ वर्तवित आहेत.

क्रेडाई प्रदर्शनाला कालपासून प्रारंभ झाला. आज अनेक आस्थापनांना सुटी असल्याने हजारो नाशिककरांनी प्रदर्शनाला गर्दी केली आहे.

सुमारे १५ लाखांपासून ते २ कोटीपर्यंत घरांचे विविध पर्याय इथे उपलब्ध असून शहरातील मान्यवर बांधकाम व्यावसायिक येथे सहभागी झाले आहेत.

तयार फ्लॅट आणि घरासोबतच इंटेरियर डिझायनिंग, गृहकर्ज, बांधकाम साहित्य, किचन ट्रॉलिज, नर्सरी अशा विविध उपयुक्त आणि आवश्यक सेवांचेही येथे स्टॉल्स लागले असून घरासंदर्भात परिपूर्ण सेवा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

अनेक बांधकाम व्यावसायिकांकडे तयार फ्लॅट असून बांधकाम सुरू असलेल्या इमारतींमध्ये सँम्पल फ्लॅट पाहण्याची सोयही इथे उपलब्ध करवून देण्यात आली आहे.

आधुनिक पद्धतीचे मॉडर्न आणि अल्ट्रा मॉडर्न जीवन शैलीचे फ्लॅटही या ठिकाणी उपलब्ध असून अनेकांचे ते आकर्षण ठरत आहेत.

क्रेडाईतर्फे दरवर्षी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. त्यातून शेकडो लोकांचे गृहस्वप्न पूर्ण होते. या ठिकाणी आलेले पाटील दांपत्य म्हणाले की या प्रदर्शनात आमच्या आवाक्यातले अनेक पर्याय एका छताखाली उपलब्ध झाले असून त्यातील काही आम्ही पसंत केले आहे. त्यामुळे आमचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होईल अशी आम्हाला आशा आहे.


सध्या नाशिक शहरातील घरांच्या किंमती स्थिर असून बँकांचे घटलेले व्याजदर आणि पंतप्रधान आवास योजनांसारख्या अर्थसहाय्याच्या योजनांमुळे नाशिककरांना गृहखरेदीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भविष्यात ही स्थिती कदाचित बदलू शकते. त्यामुळे आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांनी आताच घर बुक केल्यास त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो, असे आवाहन एका बांधकाम व्यावसायिकांनी केले.

LEAVE A REPLY

*