सहजतेने मतदान व्हावे यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करा : राज्य निवडणुक आयुक्त जे.एस.सहारिया

0

 

मालेगाव | आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करतांनाच मतदानाच्या दिवशी मतदारांना सहजतेने मतदान करता यावे यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज दिले.

महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी दिनांक 24 मे 2017 रोजी मतदान होणार असून त्याची प्रशासकीय तयारी अंतिम टप्यात असून त्याबाबतचा आढावा यावेळी  राज्य निवडणूक आयुक्त जे.स.सहारिया यांनी घेतला.

यावेळी  मुख्य निवडणूक निरीक्षक राधेश्याम मोपलवार, राज्य  निवडणूक आयोगाचे  सचिव  शेखर चन्ने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, जिल्हा पोलीस अधिक्षक अंकुश शिंदे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा मनपा आयुक्त रविंद्र जगताप, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,  उपविभागीय अधिकारी अजय मोरे,तहसिलदार डॉ. सुरेश कोळी, अप्पर पोलीस अधिक्षक राकेश ओला, सर्व प्रभागांचे निवडणूक निर्णय अधिकारी , पोलीस अधिकारी  व विविध खात्याचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

यावेळी सहारिया म्हणाले, आदर्श आचार संहितेची कडक अंमलबजावणी करतांना उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबत दक्षता घ्यावी  जेणे करुन प्रत्यक्षातील खर्च विहित मर्यादेच्या बाहेर जाणार नाही यासाठी त्याचे प्रचाराची वाहने, सभा आदि खर्चाची बारकाईने पडताळणी केली जावी  तसेच आचार संहितेच्या भंग करणाऱ्यावर तातडीने  कारवाई  करावी .

मतदान केंद्रांना सुविधा देतांना पिण्याचे पाणी, सुरक्षा व्यवस्था, उन्हाच्या वेळी सावलीची व्यवस्था, मदत कक्ष, प्रसाधनगृह आदि असाव्यात. तसेच दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर, रुग्णवाहिकेची उपलब्धता, मतदान कक्षा पर्यंत रॅपची व्यवस्था याच्याबरोबरच त्यांची वहाने मतदान केंद्रापर्यंत येण्याची सोय करावी जेणे करुन त्यांनाही आपण या प्रकियेचा एक भाग असल्याचा जाणीव होईल अशा सुचना आयुक्त श्री. सहारिया यांनी दिल्या.

सर्व मतदारांना मतदार चिठ्ठीचे वाटप व्हावे यासाठी प्रयत्न केले जावेत तसेच मतदान केंद्राच्या जवळ हेल्प डेस्क व्दारे त्यांचे मतदार यादीतील नाव कळावे यासाठी संबंधितांना मतदार यादी व ट्रु- व्होटर ॲप्सची उपलब्धता करुन दयावी असे राज्य निवडणूक आयुक्त म्हणाले.

याप्रसंगी सचिव श्री. चन्ने यांनी सांगितले की मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आवश्यकत्या सर्व उपाय योजना केल्या जाव्यात. उमेदवारांनी   निवडणूकीचा खर्च आयोगास सादर करणे बंधनकारक असून   उमेदवारी माघारी घेणा-यानी सुध्दा वेळेत खर्चाचा तपशिल दयावा. त्यांच्याकडून योग्या त्या कालावधीत पूर्तता करुन घेण्याची प्रशासनाने काळजी घ्यावी  असे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री.राधाकृष्णन, पोलीस अधिक्षक श्री.शिंदे यांनी विविध विषयांबाबत माहिती दिली.

मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त रविंद्र जगताप यांनी मतदानासाठी 569 मतदान केंद्र 115 इमारतीमध्ये सज्ज करण्यात येत असून 3 ,91,320 मतदार मतदान करतील यासाठी 3,355 कर्मचारी नियुक्त करणत आले आहेत अशी माहिती दिली.

मतदानाच्या दिवशी प्रत्यक्षात 1,110  पोलीस कर्मचारी , 114 अधिकारी व 8 वरिष्ठ पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार असून त्यांच्या मदतीला 572 गृहरक्षक दलाचे जवान असतील असे राकेश ओला यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*