बारावीच्या विद्यार्थ्याने खडूवर रेखाटले शिल्प

0

संदीप वाकचौरे

गणोरे(वार्ताहर) – अत्यंत ठिसूळ व कमी जागा असलेल्या खडूवर एखादे अप्रतिम शिल्प कोरले गेले …ते शिल्प मनाची पकड घेऊ शकले तर आपणास ते काम एखादया व्यावसायिक कौशल्य प्राप्त असलेल्या शिल्पकाराचे आहे असे वाटेल. पण हे कोरीव काम चक्क बारावीत शिकत असलेल्या जयेश शिवाजी औटी या मुलांने केले आहे. खडूवर रेखाटलेले शिल्प अनेकांच्या मनात सौंदर्यांची अनुभूती देते. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय त्याने कलेच्या प्रांतात मारलेली भरारी कौतूकाचा विषय ठरत आहे.

जयेशने खडूवर कंपासपेटीतील करकटकाच्या सहाय्याने अंत्यत सूंदर असे शिल्प रेखाटले आहे. त्याच्या भावमुद्रा पहात क्षणी मनाच्या खोलवर ठाव घेतात. गळ्यातील अंलकार, हस्त, पाद, बोटे, वस्त्र इतके सुंदर कोरले आहे की त्याच्या या कौशल्याला कोणीही नामवंत कलाकार दाद दिल्याशिवाय राहणार नाही.

या बरोबरच जयेश अंत्यत सुंदर चित्र रेखाटतो. त्याचे रेखाटन कौशल्य आणि रंगसंगतीचे ज्ञानही विचार करण्यास भाग पाडणारे आहे. घरातील देव घरात असलेले देवही चांदीच्या पत्र्यावर त्याने कोरले आहे. त्या करीता पुन्हा घरातील टाकाऊ साहित्याचाच वापर केला जातो.

एखादे साहित्य नसेल तर त्या करीता संबधित व्यावसायीका कडे जाणे, साहित्य आणणे आणि काम करणे असा त्याचा छंद आहे. कलेतील रेखाटन, शिल्प, धातूवरील कोरीव काम हे त्याचे आवडते छंद आहेत. त्यांच्या देवघरात असलेले देवही त्यांनेच स्वहस्ते तयार केले आहे हे विशेष. अगदी गणपती उत्सव आला की, घरात बसणारा गणपती हा विकत आणण्याची पंरपरा गत काही वर्षात जणू खंडीत झाली आहे. तो दरवर्षी मातीचा गणपती करतो…रंगवतो…आणि त्याच गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून पूजा अर्चा करीत विसर्जन करतो.

या कलेबरोबर स्वयंपाक कला हाही त्याचा आवडीचा विषय…पुरणपोळी पासून..मासवडी..अगदी सुगरण करेल ते सर्व प्रदार्थ तो स्वतः तयार करतो..केक तयार करणे..बिस्कीट तयार करणे..उत्तम दर्जाच्या ह़ॉटेल मध्ये जे जे पदार्थ मिळतात ते सर्व करण्यास जयेश आघाडीवर असतो..अशा विविध प्रांतात आघाडीवर असलेला जयेश हा अवघ्या बारावीच्या वर्गात शिकत आहे.यासाठी त्याने कोणत्याही महाविद्यालय..विद्यालयात अधिकृत प्रशिक्षण घेतलेले नाही.केवळ छंद जोपासत असताना प्राप्त केलेले कौशल्य हे एखाद्या महाविद्यालयात शिकून कसलेल्या कलाकारासारखे आहे.त्याचे या कलेचें सर्वत्र कौतूक होत आहे.

जयेश याचे वडील जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास संस्थेत वर्ग एकचे अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मुळचे राळेगण सिध्दीचे रहीवासी असलेले औटी नोकरीचे निमित्ताने संगमनेर-अकोले स्थिरावले आहे.जयेश अंत्यत मळमिळावू असून त्यांची ही कला आता अनेकांसाठी कौतूकाचा विषय ठरत आहे.

जयेशने केलेले शिल्पकाम त्याचे वय पाहून आणि कोणतेही व्यावसायीक प्रशिक्षण नसलेल्या कलाकारने केले आहे यावर विश्वास बसत नाही. मात्र त्याने कलेच्या प्रांतात इतक्या लहान वयात प्राप्त केलेले कौशल्य तोंडात बोट घालण्यास लावणारे आहे. शिल्पकाम आणि त्या शिल्पातील भावमुद्रा तर आश्चर्यांच्या धक्काच देतात.जे अनेकांना वर्षानुवर्ष काम केल्यावर जमत नाही हे कौशल्य जयेशने प्राप्त केले आहे …हे अंत्यत कौतूकास्पद आहे.
– प्रकाश पारखे, चित्रकार व कला शिक्षक.

LEAVE A REPLY

*