चाकूने वार करुन खूनाचा प्रयत्न; वकील व भावास 7 वर्षांची शिक्षा

0
सचिन घावटे
नितीन घावटे

नेवासा येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल;
नेवाशातून अंमळनेरकडे कारमधून जाताना रस्त्यात केला होता वार

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – खून केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वकीलासह त्याच्या भावास 7 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली.
सचिन रामकिसन घावटे (वय 25) व नितीन रामकिसन घावटे (वय 27) दोघेही मूळचे रा. अमळनेर ता. नेवासा या दोघांना शिक्षा झाली. नेवासा न्यायालयात वकीली करणारे लक्ष्मण ज्ञानदेव घावटे यांना पोटावर व शरीराच्या इतर भागावर चाकूचा वार करुन खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नेवासा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एल. टिकले यांनी दोन आरोपींना दोषी धरुन भारतीय दंड विधान कलम 307 नुसार 7 वर्षे सक्तमजुरी तसेच 201 नुसार 6 महिने अशा एकत्रित शिक्षा व प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. अनिल सरोदे यांनी काम पाहिले.
याबाबत माहिती अशी की, 19 ऑगस्ट 2015 रोजी फिर्यादी ज्ञानदेव गणपत घावटे व आरोपी क्र. 3 रामकिसन सुखदेव घावटे (दोघेही रा. अंमळनेर ता. नेवासा) यांच्यामध्ये सकाळी दहा वाजता बोअरवरील मोटार बंद केल्याच्या कारणावरुन किरकोळ भांडणे झाली होती.
सदर दिवशी नागपंचमीचा सण असल्याने जखमी लक्ष्मण घावटे हा त्याच्या पत्नीस नेवासा येथून घेवून अंमळनेर या ठिकाणी गेलेला होता. त्याने आरोपी क्र. 3 यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सदर भांडणाच्या कारणावरुन आरोपी क्र. 3 रामकिसन घावटे यांनी अहमदनगर येथे वास्तव्यास व व्यवसाय करत असलेली त्यांची मुले आरोपी क्र. 1 संजय रामकिसन घावटे व आरोपी क्र. 2 नितीन रामकिसन घावटे यांना सदरची बाब फोनद्वारे कळविली.
सदर घटनेचा राग येवून आरोपी क्र. 1 व 2 यांनी नेवासा न्यायालयात जावून त्यांना जखमी लक्ष्मण यास गावाकडे जावून भांडणे मिटविण्यास जावू असे सांगून त्यास गावाकडे येण्याचा आग्रह धरला. त्यानंतर लक्ष्मण व आरोपी क्र. 1 सचिन तसेच फिर्यादी ज्ञानदेव घावटे व लक्ष्मण घावटेचे नेवासा न्यायालयातील वकील मित्र अ‍ॅड. पाठे व अ‍ॅड. आरगडे यांचेसोबत मारुती कारमध्ये अंमळनेर गावाकडे जात असताना आरोपी सचिन याने कमरेत लपवून ठेवलेला चाकू काढून लक्ष्मण याच्यावर अचानक हल्ला करुन त्यास गंभीररित्या जखमी करुन त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला व आरोपी क्र. 2 सोबत त्याचे मोटारसायकलवर बसून घटनास्थळावरुन फरार झाला.
घटनेनंतर तातडीने लक्ष्मण यास खालकर हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर त्याठिकाणी तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया दरम्यान लक्ष्मण याचे लहान आतड्याचा बराचसा भाग काढून टाकावा लागला.
सदर घटनेबाबत फिर्यादी ज्ञानदेव घावटे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दि. 19 ऑगस्ट 2015 रोजी जावून फिर्याद दिली. सदरची घटना नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली असल्याने सदरचा गुन्हा नेवासा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. सदर गुन्ह्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांनी तपास करुन तिन्ही आरोपींविरुद्ध नेवासा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदरच्या खटल्याचे कामकाज सुरुवातीस नेवासा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर व त्यानंतर ए. एल. टिके यांचे समोर चालले. सदर खटल्याकामी सरकार पक्षातर्फे एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले.
सदर खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जखमी लक्ष्मण, अ‍ॅड. पाठे व फिर्यादी ज्ञानदेव तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल खालकर यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकील औड. अनिल सरोदे यांनी बाजू मांडली. त्यांना नेवासा न्यायालयातील अ‍ॅड. अण्णासाहेब अंबाडे यांनी मूळ फिर्यादीतर्फे सहाय्य केले.
सरकार पक्षाचा आलेला भक्कम पुरावा व युक्तीवादाचय आधारे नेवासा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एल. टिकले यांनी दोन आरोपीस दोषी धरुन भारतीय दंड विधान कलम 307 सह 34 नुसार 7 वर्षेे सश्रम कारावास व 201 नुसार 6 महिने सक्तमजुरी या शिक्षा एकत्रित भोगावयाच्या त्याशिवाय प्रत्येकी 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली असून दंड न भरल्यास आणखी 6 महिन्यांची शिक्षा भोगावी लागणार आहे.
आरोपी क्र. 1 सचिन हा अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात वकीली व्यवसाय करत होता तर आरोपी क्र. 2 नितीन हा एका फायनान्स कंपनीत कॅशियर पदावर काम करत होता. या खटल्याच्या निकालाकडे जिल्ह्यातील वकीलांचे व परिसराचे लक्ष लागले होते.

LEAVE A REPLY

*