संगमनेरातील एकाला आजन्म जन्मठेप

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी दोषी धरुन सीताराम बाबुराव जगताप उर्फ भाऊसाहेब साळवे (रा. कनोली, ता. संगमनेर) यास जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत जन्मठेप व एक हजार दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
आरोपी जगताप हा 1987 साली कोल्हार खुर्द येथे शेतकाम करण्यासाठी एका शेतकर्‍याकडे सालाने होता. मालकाचा विश्‍वास संपादन केल्यामुळे ते जगतापला घरातील सदस्य समजत होते. 21 जानेवारी 1988 साली या शेतकर्‍याला एका देवीच्या यात्रेसाठी बाहेर जायचे होते.
त्यामुळे त्याने त्याची साडेआठ वर्षाची मुलगी भावाकडे ठेवली होती. दरम्यान त्या दिवशी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही मुलगी हेलकरूबाबा यांच्या मंदिरात दिवा लावण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्या एकटेपणाचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. हा नराधम येथेच थांबला नाही. तर त्याने चिमुरड्या मुलीस ठार मारले. त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी का येईना म्हणून तिची शोधाशोध करण्यात आली.
मात्र तिचा तपास लागला नाही. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या दरम्यान आरोपी जगताप हा पसार झाला होता. या घटनेचा शोध घेत असताना तो संगमनेर तालुक्यातील साकूर येथे असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्यास 23 जानेवारी 1988 रोजी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी काही सबळ पुरावे ताब्यात घेऊन पोलीस निरीक्षक भोईटे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
मात्र या घटनेच्या पूर्वीच 1987 साली आरोपी सीताराम जगताप याने राहाता तालुक्यातील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मुलीवर अत्याचार केला होता. या प्रकरणात तो गेल्या काही दिवसांपासून तो पसार होता. राहुरी पोलिसांनी त्यास अटक केल्याची माहिती मिळताच लोणी पोलिसांनी आरोपी जगतापला लोणीच्या गुन्ह्यात वर्ग केले. 31 ऑगस्ट 1988 रोजी श्रीरामपूर न्यायालयाने जगतापला दोषी धरुन सात वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती.
ही शिक्षा आरोपी सीताराम जगताप याने पूर्ण केली व तो बाहेर आला. या दरम्यान त्याला दुसर्‍या गुन्ह्यात वर्ग करणे आवश्यक होते. मात्र असे झाले नाही. लोेणी येथील अत्याचाराच्या गुन्ह्यातील शिक्षा झाल्यानंतर आरोपी पसार झाला. फिर्यादींच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी या आरोपीचा तपास सुरू केला. मात्र 2016 पर्यंत तो मिळून आला नाही. तब्बल 30 वर्षानंतर पोलिसांनी त्यास अटक केली. अत्याचार करून खून केल्याचा प्रकार जुना असल्यामुळे हे प्रकरण जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्याकडे आले. या घटनेला विशेष प्राधान्य देत त्यांनी एका वर्षात खटल्याचा निकाल लावला.
सरकार पक्षातर्फे 10 साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अधिकारी, फिर्यादी, तपासी अधिकारी यांचे जबाब महत्वाचे ठरले. सरकारी वकील अर्जुन बी. पवार यांचा प्रबळ युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीस नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत जन्मठेप व एक हजार दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या खटल्याची चौकशी सुरू असताना राहुरीचे पोलीस कर्मचारी एम. डी. राजपुत व पैरवी अधिकारी पी. टी. हुशारे यांनी सहाय्य केले.

LEAVE A REPLY

*