शनिभक्तांना लुटणार्‍या आरोपीस सात वर्ष कारावास

0

कोपरगाव जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – शनिभक्तांना दर्शनासाठी घेवुन जातो असे सांगून दोघांनी 13 हजार रुपयास लुटल्या प्रकरणी कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींना सात वर्ष कारावास व 3 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

याबाबत हकीगत अशी की, राकेशकुमार मणिराम कांचन व मेरी उर्फ सुनिता जॉन पेटीट या आरोपींनी फिर्यादी हिला देवदर्शनासाठी जायचे आहे असे सांगून झाशी येथून शिर्डी व शनी शिंगणापूर येथे दर्शनासाठी आणले होते.

ते शनीशिंगणापूरला येऊन पुन्हा शिर्डीकडे खाजगी वाहनातून जात असताना शौचास जायचे आहे, असा बहाणा आरोपी यांनी करुन वाहनातून उतरुन फिर्यादीस कोल्हार येथील प्रवरा नदी पात्रात नेऊन आरोपीने तिच्या जवळील रोख रक्कम 5 हजार व सोन्याचे 8 हजार किंमतीचे दागिने असा एकूण 13 हजारचा ऐवज बळजबरीने लुटला व गळा आवळला.

त्यानंतर सदर प्रकरणी फिर्यादी प्रभा ताराचंद यांचे फिर्यादीवरुन लोणी पोलीस स्टेशनला गुरनं 95/2015 भादवि कलम 307, 397 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये पोलीसांनी सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. त्यात न्यायालयाने भादवि कलम 392 सह 34 प्रमाणे आरोपींवर दोषारोप ठेवले होते. त्यामध्ये फिर्यादीसह 9 साक्षीदार व तपासी अधिकारी डी. सी. लोकडे यांचे जबाब महत्वाचे ठरले.

दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र.2 यांनी आरोपीस भादवि कलम 392 सह 34 अन्वये दोषी धरुन 5 वर्ष सक्षम कारावास व प्रत्येकी 3 हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यांस तिन महिन्याची कारावासाची शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. बी.डी. पानगव्हाणे यांनी कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

*